स्पॉट-फिक्सिंग प्रकरणासंदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मयप्पनला मुंबई पोलिसांनी शुक्रवारी रात्री सट्टेबाजी आणि सामना निश्चिती प्रकरणी अटक केली. आयपीएल बेटिंग आणि स्पॉट-फिक्सिंगप्रकरणी अभिनेता विंदू दारा सिंग आणि मयप्पन यांची एकत्रित चौकशी करण्याची इच्छा असल्याचे मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने शुक्रवारी न्यायालयात स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, विविध स्तरांतून श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर बीसीसीआय या प्रकरणासाठी माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांचा सल्ला घेण्याची शक्यता आहे.
विंदू आणि मयप्पन यांचे फिक्सिंगसंदर्भात संबंध असल्याचे एका दूरध्वनी संभाषणावरून स्पष्ट झाले आहे. सामना जिंकल्यावर मिळालेले पैसे गुरुनाथ हा देवेंद्र कोठारी या इसमाच्या नावावर जमा करायचा. सामन्यात फिक्सिंग केल्यावर विंदूने सांगितलेले पैसे सट्टेबाजांकडून परेश या इसमाच्या नावावर जमा व्हायचे आणि विंदूच्या सांगण्यावरून तो पैशांचे वाटप करायचा.मयप्पन आणि विंदू यांचे संबंध फक्त पैशांपुरते मर्यादित नव्हते, तर विंदू मयप्पनला ललना पुरवायचा, असे पुढे आल्याचे सूत्रांनी सांगितले. पंच असद रौफ यांनी पाकिस्तानला पळ काढल्याचे वृत्त उघड झाले आहे. मयप्पन यांनी मुंबई पोलिसांना भेटण्यापूर्वी एन. श्रीनिवासन यांची मदुराई येथे भेट घेतली. या भेटीनंतर श्रीनिवासन यांनी आपले काही अधिकारी आणि वकील मयप्पनसह मुंबईत पाठवले असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या व्यवस्थापनाने मयप्पन कंपनीचा फक्त मानद सदस्य होता, असे म्हणत हात वर केले आहेत. दरम्यान, शुक्रवारी दुपारी आयपीएलचे प्रमुख राजीव शुक्ला आणि बीसीसीआयचे उपाध्यक्ष अरुण जेटली यांनी शुक्रवारी कायदेमंत्री कपिल सिबल यांची भेट घेऊन सामनानिश्चितीविरोधात लवकरात लवकर कठोर कायदा आणण्याची मागणी केली.दरम्यान, मुंबईतील न्यायालयाने शुक्रवारी विंदू दारा सिंग याच्या पोलीस कोठडीत २८ मेपर्यंत वाढ केली आहे. विंदू याने ज्युपिटर, पवन जयपूर आणि संजय जयपूर यांच्याशी बेटिंग केले असून ते सर्वजण फरार आहेत. विंदू याने स्वत: अन्य लोकांकडून बेटिंग स्वीकारले असून ते या फरारी बुकींकडे पाठविले, असे गुन्हे अन्वेषण विभागाने याचिकेत म्हटले आहे.
गुरुनाथ मयप्पनला सट्टेबाजी आणि सामना निश्चिती प्रकरणी अटक
स्पॉट-फिक्सिंग प्रकरणासंदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मयप्पनला मुंबई पोलिसांनी शुक्रवारी रात्री सट्टेबाजी आणि सामना निश्चिती प्रकरणी अटक केली. आयपीएल बेटिंग आणि स्पॉट-फिक्सिंगप्रकरणी अभिनेता विंदू दारा सिंग आणि मयप्पन यांची एकत्रित चौकशी करण्याची इच्छा असल्याचे मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने शुक्रवारी न्यायालयात स्पष्ट करण्यात आले.
First published on: 25-05-2013 at 04:20 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl spot fixing csk boss gurunath meiyappan arrested in mumbai