आयपीएल स्पॉट-फिक्सिंगप्रकरणी अटकेत असलेल्या राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंची माहिती आणि त्यांच्या कराराची माहिती मिळवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी संघाचे मालक राज कुंदरा यांना चौकशीसाठी बोलावले होते. कुंदरा यांच्याबरोबर त्यांचा मित्र उमेश गोएंका यांचीही या वेळी चौकशी करण्यात आली.  
कुंदरा यांना संशयित की तक्रारदार म्हणून बोलावण्यात आले होते, या प्रश्नाला उत्तर देताना दिल्ली पोलिसांनी त्यांना ‘महत्त्वाची व्यक्ती’ म्हणून चौकशीसाठी बोलावले होते, असे स्पष्ट केले.लोधी रोडवरील दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाच्या कार्यालयात कुंदरा बुधवारी सकाळी १० वाजता आले होते आणि संध्याकाळी उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंदरा यांचा ‘स्टील’चा व्यवसाय असून त्या व्यवसायामुळे कुंदरा आणि गोएंका एकत्र आले आहेत. राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज आणि या प्रकरणात साक्षीदार असलेला सिद्धार्थ त्रिवेदी याची चौकशी करताना गोएंका यांचे नाव पुढे आले आहे.
त्रिवेदीने चौकशीदरम्यान सांगितले की, ‘‘गोएंका मला काही वेळा भेटले. त्यांनी अहमदाबाद येथील सामन्यावेळी खेळपट्टीची माहिती विचारली, त्याचबरोबर संघाच्या व्यूहरचनेबद्दल माहिती विचारली होती.’’
दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या वेळी सांगितले की, ‘‘कुंदरा आम्हाला म्हणाले की, माझ्याकडे संघाचे ११.७ समभाग आहेत. ललित मोदी यांचे चुलत भाऊ सुरेश चेलाराम यांचे ४३ टक्के आणि मनोज बदाले यांचे संघात ३४ टक्केसमभाग आहेत. रुपर्ट मरडॉक यांचा मुलगा लालचनचाही संघाच्या मालकीत सहभाग आहे. कुंदरा यांचे स्टील व्यवसायात ४२ टक्केसमभाग असून त्यामध्ये गोएंकांचा १६ टक्के एवढा हिस्सा आहे.
याआधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय), आयपीएल आणि खेळाडूंदरम्यान झालेल्या कराराची माहिती करून घेण्यासाठी दिल्ली पोलिसांनी बीसीसीआयचे माजी सचिव संजय जगदाळे आणि आयपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर रमण यांची भेट घेतली होती.
तुम्ही कुंदरा यांना आरोपी ठरवत आहात का, या प्रसारमाध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना पोलीस अधिकारी म्हणाले की, ‘‘सध्या त्यांच्याबद्दल आमचा तसा दृष्टिकोन नाही आणि त्यांची सध्या चौकशी करत आहोत. कुंदरा यांची मित्र गोएंका सामन्यानंतर होणाऱ्या पाटर्य़ामध्ये यायचे आणि खेळाडूंशी संपर्क साधायचे.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा