ललित मोदींची ट्विटरवरून प्रतिक्रिया
आयपीएलचे माजी प्रमुख ललित मोदी यांनी आपल्या ट्विटर अकांऊटवर चेन्नईत झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीवरून “क्रिकेटमध्ये सर्वात महत्त्वाच्या घटना सध्या सुरु आहेत. बीसीसीआय अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांच्याबरोबर, या प्रकरणात अरुण जेटली व राजीव शुक्ला देखील तितकेच दोषी आहेत.” असे म्हटले. त्याचबरोबर जगमोहन दालमिया यांना अंतरिम अध्यक्षपद देणे हा काही या प्रकरणावरचा उपाय नसल्याचेही ललित मोदी म्हणाले.

स्पॉट फिक्सिंग प्रकरणात जावयाच्या अटकेवरून श्रीनिवासन यांच्यावर राजीनाम्याचा वाढता दबाव लक्षात घेता, बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांची चेन्नईमध्ये तातडीची बैठक घेण्यात आली. यात राजीनामा न देण्याचा आपला पवित्रा श्रीनिवासन यांनी कायम राखत केवळ अध्यक्षपदाच्या अधिकारांचा त्याग केला व जगमोहन दालमिया यांना बीसीसीआयचे अंतरिम अध्यक्षपद देण्यात आले. “दालमियांना अंतरिम अध्यक्षपद हा या प्रकरणावरील उपाय होऊ शकत नाही” असे ललित मोदींनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर म्हटले आहे.     
      

Story img Loader