नेहमीच गुर्मीत राहून प्रसारमाध्यमांना जास्त भाव न देणारे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्यामागचे शुक्लकाष्ठ संपण्याचे नाव घेताना दिसत नाही. सट्टेबाजी प्रकरणात अडकलेला जावई आणि आयपीएलच्या अंतिम फेरीच्या वेळी प्रेक्षकांनी त्यांची हुर्यो उडवल्याने ते कमालीचे बेचैन असून त्यांनी हा सारा राग प्रसारमाध्यमांवर काढला आहे. प्रसारमाध्यमं मला लक्ष्य करत असून हात धुऊन माझ्या मागे लागले आहेत, असे श्रीनिवासन यांचे म्हणणे आहे.
जावई गुरुनाथ मयप्पन सट्टेबाजी आणि स्पॉट फिक्सिंग प्रकरणात मुंबई पोलिसांच्या कोठडीत आहे. त्याच्यावरून काही जणांनी श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याची मागणी केली, त्याला त्यांनी केराची टोपली दाखवली. स्वत:ची खुर्ची वाचवली, पण गुरुनाथबद्दल बोलताना त्यांनी हात आखडता घेतला. पण हे सारे क्रिकेटच्या चाहत्यांना नक्कीच बोचले आणि आयपीएलच्या अंतिम फेरीच्या सोहळ्यात मिरवण्यासाठी आलेल्या श्रीनिवासन यांची प्रेक्षकांनी हुर्यो उडवली.
प्रसारमाध्यमं मला लक्ष्य करत आहेत, काही केल्या माझा पिच्छा ते सोडत नाहीत. मी साऱ्या प्रश्नांची उत्तरे पत्रकार परिषदेमध्ये दिली आहेत, सगळ्या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. मी राजीनामा देण्याचा काही संबंधच नाही, असे श्रीनिवासन यांनी पुन्हा एकदा खंबीरपणे सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा