भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची रविवारी झालेली बैठक म्हणजे निव्वळ धूळफेक असल्याचे मत व्यक्त करणे अव्यवहार्य आहे, असे मंडळाचे माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी सांगितले. मंडळाचे अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांची पाठराखण करीत दालमिया म्हणाले, मंडळाच्या काही सदस्यांनी श्रीनिवासन यांचा राजीनाम्याची मागणी केली होती. माझ्या मतानुसार ही मागणी करणे अतिशय घाईने व्यक्त केलेली प्रतिक्रिया आहे. काही सदस्यांनी येथील बैठक निरुपयोगी असल्याचे मत व्यक्त केले आहे. हे मत व्यक्त करणाऱ्यांबद्दल मला आश्चर्य वाटत आहे.
मंडळाचा कारभार दालमिया यांच्याकडे देण्याची अट घालून श्रीनिवासन यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शविली. मंडळाचा कारभार पाहण्यासाठी चार सदस्यांची समिती नियुक्त केली असून त्याचे प्रमुखपदी दालमिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीमधील कोणत्याही व्यक्तीने श्रीनिवासन यांचा राजीनामा मागितलेला नाही. आमची समिती ही काही तडजोड नसल्याचेही दालमिया म्हणाले. स्पॉटफिक्सिंग प्रकरणामुळे मंडळाच्या प्रतिष्ठेस तडा गेल्याचे मान्य करीत दालमिया म्हणाले, या प्रकरणामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्या दूर करणे जरुरीचे आहे.
‘शिर्के व जगदाळे यांच्याकडील जबाबदारीही मी पार पाडेन’
जर मंडळाचे सचिव संजय जगदाळे व कोषाध्यक्ष अजय शिर्के हे आपल्या पदावरील जबाबदारी पेलण्यास असमर्थ असतील, तर त्यांच्यावर सोपविलेली जबाबदारी पेलण्याची माझी तयारी आहे, असे दालमिया यांनी सांगितले. जगदाळे व शिर्के यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे आणि नवीन कार्यकारिणीत काम करण्याची तयारी नसल्याचे कळविले असल्याचे समजले, असेही त्यांनी सांगितले.

Story img Loader