बीसीसीआयच्या आर्थिक समितीचे अध्यक्ष ज्योतिरादित्य शिंदे यांनी एन. श्रीनिवासन यांच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर हे प्रकरण चांगलेच तापले आहे. त्यानंतर बुधवारी आयपीएलचे प्रमुख राजीव शुक्ला आणि अरुण जेटली या बीसीसीआयच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणात आणखी तेल ओतून रंगत आणली आहे. जावई गुरुनाथ मयप्पनची चौकशी सुरू असेपर्यंत श्रीनिवासन यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे, अशी मागणी शुक्ला आणि जेटली यांनी बुधवारी केली. राजकीय नेतेमंडळींच्या या ‘फिल्डिंग’मुळे श्रीनिवासन यांच्यावर राजीनाम्याचे दडपण वाढत असल्याचे प्रत्ययास येत आहे. याचप्रमाणे केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनीसुद्धा स्पॉट-फिक्सिंग संदर्भात तोफ डागून आयपीएलच्या सहाव्या हंगामातील सर्व सामन्यांची गृहमंत्रालयातर्फे चौकशीची मागणी केली.
बीसीसीआयचे उपाध्यक्ष अरुण जेटली यांची भेट घेतल्यानंतर शुक्ला यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधताना श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याबाबत उल्लेखही केला नाही. मात्र केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने नैतिकतेच्या मुद्दय़ावरून श्रीनिवासन यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याबाबत बीसीसीआयशी संबंधित सर्वच राजकीय नेत्यांनी मौन पाळले असताना ज्योतिरादित्य शिंदे यांनी तोफ डागताच शुक्ला आणि जेटली यांनीही सावधपणे आपला निशाणा साधला आहे. शुक्ला या संदर्भात म्हणाले की, ‘‘माझी श्रीनिवासन यांच्याशी आधीसुद्धा चर्चा झाली होती. ही चौकशी सुरू असेपर्यंत त्यांनी पदापासून दूर राहावे. श्रीनिवासन यांनी आता हा निर्णय घ्यायला हवा. जेटली यांचेसुद्धा हेच म्हणणे आहे. बीसीसीआयची प्रतिष्ठा आमच्यासाठी महत्त्वाची आहे. भारतीय क्रिकेट आणि बीसीसीआय यांच्या भल्यासाठी आम्ही कार्यरत आहोत.’’
मयप्पन आणि स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात अडकलेले तीन खेळाडू याचप्रमाणे राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्जचे फ्रेंचायझी यांच्या चौकशीसाठी बीसीसीआयने त्रिसदस्यीय चौकशी समिती नियुक्त केली आहे. न्या. टी. जयराम चौटा, न्या. आर. बालसुब्रमण्यम आणि बीसीसीआयचे सचिव संजय जगदाळे या सदस्यांचा चौकशी आयोगामध्ये समावेश आहे.
‘‘या चौकशी आयोगाने सुचविलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करणे बीसीसीआयसाठी बंधनकारक असेल. हा अहवाल बीसीसीआयकडे आल्यानंतर त्यावर चिंतन होईल आणि मग तो प्रकाशात येईल, असे मुळीच होणार नाही,’’ अशी ग्वाही शुक्ला यांनी दिली.
‘‘शुक्ला हे निवडून आलेले अध्यक्ष आहेत. या प्रक्रियेपासून श्रीनिवासन यांनी दूर राहावे, असे माझे आणि जेटली यांचे म्हणणे आहे. आम्ही याबाबत त्यांना सुचविले आहे आणि याबाबतचा निर्णय घेणे हे त्यांच्या हाती आहे. माझ्याकडून कोणतीही चूक झाली नसताना मी शिक्षा का भोगावी, असे त्यांचे म्हणणे आहे,’’ असे शुक्ला या वेळी म्हणाले.
‘‘या संदर्भातील चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे आणि यातील बहुतांशी सदस्य हे क्रिकेटशी निगडित नाहीत. यात दोन न्यायाधीश आहेत. हा अहवाल बीसीसीआयकडे जाणार नाही, असे आम्ही स्पष्ट केलेले आहे. यातील शिफारशींची अंमलबजावणी करयात येईल. हेच आम्हाला अपेक्षित होते,’’ असे शुक्ला यांनी सांगितले.
केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने औचित्याच्या मुद्दय़ावरून श्रीनिवासन यांचा राजीनामा मागितला आहे. त्यांनी आपल्या निवेदनात असे म्हटले आहे की, ‘‘मॅच-फिक्सिंग आणि स्पॉट-फिक्सिंग संदर्भातील आरोपांसंदर्भात बीसीसीआय चौकशी करीत आहे. या चौकशीत मतभिन्नता आढळते आहे. या चौकशीच्या पाश्र्वभूमीवर नैतिकतेच्या मुद्दय़ावरून श्रीनिवासन यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.’’दरम्यान, हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जी. विनोद यांनीही श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा