‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणाने संपूर्ण देश हादरला असताना आता खेळामध्ये अप्रामाणिक कृत्य करणाऱ्यांसाठी लवकरच नवा कायदा आणण्यात येणार आहे, अशी माहिती कायदेमंत्री कपिल सिब्बल यांनी दिली. ‘‘महा न्यायप्रतिनिधी जी. ई. वहानवटी यांनी नव्या कायद्याला संमती दर्शवली आहे. सामना निश्चिती किंवा स्पॉट-फिक्सिंगसारख्या प्रकारांना खीळ घालण्यासाठी नवा कायदा आणण्यात येणार आहे. या कायद्याचा पहिला आराखडा तीन ते चार दिवसांत तयार होईल. त्यानंतर तो तज्ज्ञांची मते जाणून घेण्यासाठी क्रीडामंत्र्यांकडे पाठवण्यात येईल. सर्व खेळांमधील चुकीच्या प्रकारांसाठी हा कायदा लागू असेल. कॉर्पोरेटजगत, सट्टेबाज, गुन्हेगार, खेळाडू तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू या सर्वासाठी हा कायदा लागू होईल,’’ असे सिब्बल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
नवा कायदा कधी अमलात येईल, असे विचारले असता सिब्बल म्हणाले, ‘‘ते सर्व काही विरोधी पक्षावर अवलंबून आहे. मात्र विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनी शनिवारी माझी भेट घेऊन नवा कायदा आणण्याविषयी सहमती दर्शवली होती.’’
नव्या कायद्याला राज्यांकडून अनुमती -क्रीडामंत्री
सामना निश्चिती किंवा स्पॉट-फिक्सिंगसारखे प्रकार रोखण्यासाठी केंद्राकडून अमलात आणल्या जाणाऱ्या नव्या कायद्याला सर्व राज्यांनी अनुमती दर्शवली आहे, असे क्रीडामंत्री जितेंद्र सिंग यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘सट्टेबाजीसारखे प्रकार रोखण्यासाठी आम्ही कायदेमंत्रालय आणि गृहमंत्रालयाबरोबर एकत्रपणे काम करत आहोत. लवकरच नवा कायदा आणण्यात येईल.’’

Story img Loader