बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मयप्पन ‘स्पॉट-फिक्सिंग’मध्ये अडकल्यामुळे श्रीनिवासन गोत्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. श्रीनिवासन यांना अध्यक्षपदावरून दूर करण्याची मागणी होत असली तरी ही मागणी पूर्ण करण्यात अनेक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
श्रीनिवासन यांना हटवण्यासाठी बीसीसीआयला विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करावी लागणार आहे. ही सभा पुढे ढकलण्याचे किंवा ती होऊ न देण्याचे हक्क श्रीनिवासन यांच्याकडे आहेत. बीसीसीआयच्या नियमावलीनुसार राजीनामा मागण्याचा ठराव या बैठकीपुढे चर्चेला आला, तर त्याकरिता बीसीसीआयच्या सर्व दहा सदस्यांच्या सह्य़ांची आवश्यकता आहे. मात्र हा ठराव मांडण्यापूर्वीच ही सभा पुढे ढकलण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार अध्यक्षांना आहे. तसेच कार्यकारिणीची किंवा स्थायी समितीची बैठक रद्द करण्याचाही निर्णय अध्यक्ष घेऊ शकतात. कार्यकारिणी सदस्यांच्या बैठकीची नोटीस देण्याकरिता वेळेचा कालावधी कमी करण्याचाही अधिकार अध्यक्षांना आहे. हे ठराव मंजूर करण्यासाठी आयोजित केलेल्या सभेला एक तृतीयांश सदस्यांची उपस्थिती तसेच तेवढय़ाच सदस्यांची मान्यता आवश्यक आहे.

Story img Loader