जावई गुरुनाथ मयप्पन याच्या अटकेमुळे बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्यावर राजीनामा देण्यासाठी राजकीय क्षेत्रातून दबाव वाढला आहे. ‘‘श्रीनिवासन यांचे पद अस्थिर झाले आहे. या पदाबाबत जराही विश्वासार्हता शिल्लक राहिलेली नाही. स्पॉट-फिक्सिंग प्रकरण उघडकीस आल्यानंतर ज्या पद्धतीने पुरावे समोर येत आहे, ते बघता श्रीनिवासन यांचे पद अतिशय अस्थिर झाले आहे, असे उद्गार केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री कमलनाथ यांनी काढले.
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमार अब्दुल्ला यांनी श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ‘‘बीसीसीआय क्रिकेटप्रती गंभीर असेल तर त्यांनी खेळ स्वच्छ राखण्याची मोहीम हाती घ्यायला हवी. क्रिकेट प्रशासनातील भाजप नेत्यांवरही त्यांनी टीकास्त्र सोडले. राजकारण करताना वेगळी भूमिका आणि क्रीडा प्रशासक म्हणून वेगळी भूमिका असे होऊ नये. जर काही संशयास्पद घडले असेल, तर जोपर्यंत संशय दूर होत नाही तोपर्यंत प्रमुख अधिकाऱ्यांनी पदावरून बाजूला होणे आवश्यक आहे. जर ते निर्दोष असतील तर त्यांना पदापासून कोणीही रोखू शकत नाही,’’ अशी भूमिका अब्दुल्ला यांनी मांडली.
‘‘श्रीनिवासन यांनी राजीनामा द्यावा की नाही, हे मला माहीत नाही. किती जणांचे राजानामे घेणार? कामकाजातील पारदर्शकता आणि विश्वासार्हतेचा प्रश्न मी गेल्या वर्षीही मांडला होता. त्यावेळी लोकांनी मला हास्यास्पद ठरवले होते. मी माझ्या मुद्यावर कायम राहिलो याचा मला आनंद आहे,’’ असे क्रिकेटपटू आणि राजकारणी कीर्ती आझाद यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा