स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणामुळे गेले काही दिवस भारतीय क्रिकेटला भूकंपाप्रमाणे तीव्र धक्के बसत आहेत. गुरुवारी बसलेल्या आणखी एका जबरदस्त धक्क्यामुळे भारतीय क्रिकेट पुन्हा एकदा हादरले आहे. राजस्थान रॉयल्सचा मालक राज कुंद्राने स्वत:च्या संघावर आपल्या व्यावसायिक सहकाऱ्याच्या मदतीने सट्टेबाजी केल्याची कबुली दिली आहे. दिल्ली पोलिसांनी हा दावा केल्यामुळे या प्रकरणाने उत्कंठावर्धक वळण प्राप्त केले आहे. अडचणीत सापडलेल्या कुंद्राने देश सोडू नये म्हणून पोलिसांनी त्यांचा पासपोर्ट जप्त केला आहे. सट्टेबाजीच्या या जाळ्यात त्याची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टीसुद्धा सामील आहे का, याचा पोलीस तपास करीत आहे. शिल्पाने ‘ट्विटर’वर आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. ‘कोणत्याही सामन्यावर मी कधीच सट्टा लावला नव्हता,’ असे तिने म्हटले आहे. ३६ वर्षीय कुंद्राने गेल्या तीन वर्षांत आयपीएल सामन्यांवरील सट्टेबाजीत सुमारे एक कोटी रुपये गमावले होते, असा दावा चौकशीनंतर पोलिसांनी केला आहे.
‘‘कुंद्राने सट्टेबाजी केल्याचा कबुलीजबाब दिला आहे. तो स्वत:च्याच संघावर सट्टेबाजी करायचा. सट्टेबाजीत बराच पैसा गमावल्याचेही त्याने आम्हाला सांगितले. सट्टेबाज मित्र उमेश गोएंका याच्याद्वारे कुंद्रा सट्टेबाजी करायचा,’’ अशी माहिती दिल्लीचे पोलीस आयुक्त नीरज कुमार यांनी दिली.
कुंद्राचा मित्र आणि व्यावसायिक सहकारी उमेश गोएंका खेळाडूंना संघबांधणी आणि खेळपट्टीविषयक माहिती विचारायचा, असे स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणात साक्षीदार झालेल्या सिद्धार्थ त्रिवेदीने पोलिसांनी सांगितले होते. त्यामुळे सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती कुंद्राची बुधवारी पोलिसांनी ११ तास कसून चौकशी केली होती. दंडाधिकाऱ्यांकडे नोंदवलेल्या साक्षीत त्रिवेदीने म्हटले होते की, गोएंकाने माझ्याशी संपर्क साधला होता. अहमदाबादची खेळपट्टी आणि संघाची बांधणी यासंदर्भात सखोल माहिती त्याने मला विचारून घेतली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा