गेले काही दिवस एन. श्रीनिवासन यांनी राजीनामा द्यावा, अशी देशभरातून हाक ऐकायला येत होती खरी, पण प्रत्यक्षात कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांचा राजीनामा मागितलाच नाही. ‘बैठकीत कोणीही राजीनामा मागितला नाही, चर्चेनंतर मी सांगितले की, याप्रकरणाची चौकशी होईपर्यंत मी माझे अधिकार सोडत आहे. त्यावेळीच बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांनी जगमोहन दालमिया यांना अधिकार देण्यासंदर्भात विचारणा केली आणि त्यांनी ती मान्यही केली’, असे श्रीनिवासन यांनी बैठकीनंतर सांगितले.
बैठकीमध्ये कोणी तुमचा राजीनामा मागितला का, असे विचारल्यावर कोणीही नाही, हेच त्यांचे उत्तर होते.
सट्टेबाजीप्रकरणी जावई गुरुनाथ मयप्पनला अटक झाल्यानंतर या बैठकीमध्ये श्रीनिवासन अध्यक्षपदाचा राजीनामा देतील, असे साऱ्यांना वाटले होते, पण तसे मात्र झाले नाही.
काही दिवसांपूर्वी सचिव संजय जगदाळे आणि कोषाध्यक्ष अजय शिर्के यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. यावर श्रीनिवासन यांना विचारले असता ते म्हणाले की, आम्ही सर्वानी मिळून जगदाळे आणि शिर्के यांना पुन्हा पदभार सांभाळण्याची विनंती केली आहे. ते सोमवापर्यंत आपल्या पदजावर रुजू होतील.
श्रीनिवासन यांचा राजीनामा मी एकटय़ाने मागितला होता, असा दावा बोर्डाचे सदस्य आय.एस. बिंद्रा यांनी केला होता. यावर श्रीनिवासन यांना विचारले असता ते म्हणाले की, बैठकीमध्ये बिंद्रा यांनी मला राजीनाम्याविषयी काहीही सांगितले नाही किंवा राजीनामा देण्याची मागणीही केली नाही. बैठक शांतपणे पार पडली, कोणच्याही बोलण्यात यावेळी कटुता नव्हती. आपण पुन्हा कोषाध्यक्ष पद स्वीकारणार नाही, असा दावा शिर्के यांनी केला होता, यावर कोणतीही प्रतिक्रिया श्रीनिवासन यांनी दिली नाही. ते म्हणाले की, मी शिर्के यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणार नाही. शिर्के आणि जगदाळे यांनी पुन्हा पदावर यावे, यावर बैठकीमध्ये एकमत झाले आहे. शिर्के हे माझे चांगले मित्र आहेत. त्यामुळे शिर्के आणि जगदाळे पुन्हा पदावर येतील, अशी मला आशा आहे.
दालमिया यांची नेमकी काय भूमिका असेल, असे विचारल्यावर श्रीनिवासन म्हणाले की, बीसीसीआय त्यांच्याकडे कोणती कामे सोपवते, हे पाहावे लागेल. दालमिया यांना बीसीसीआयच्या प्रशासनाचा चांगलाच अनुभव आहे आणि नियमांमुसार ते आपले काम करतील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा