मुदगल समितीने दिलेल्या अहवालात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे(बीसीसीआय) माजी अध्यक्ष एन.श्रीनिवासन व इतर १२ खेळाडूंविरोधात गंभीर स्वरूपाचे आरोप असल्याचे सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट झाल्यानंतर या आरोपांची चौकशी मुदगल समितीने करण्यास ‘बीसीसीआय’ने विरोध दर्शविला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातील निकाल राखून ठेवला आहे.  
मुदगल समितीनेच आरोपांची चौकशी करावी असे सर्वोच्च न्यायालयाने सुचविले होते. मात्र, याला विरोध करून चौकशीसाठी नवीन समिती नेमावी अशी मागणी बीसीसीआयाने सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून श्रीनिवासन दूर असले तरी जुलैमध्ये ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाचे(आयसीसी) चेअरमन होणार आहेत. त्यामुळे न्यायालयाचा निकाल महत्वाचा ठरणार आहे.
मुदगल समितीनेही आरोपांची चौकशी करण्यास तयारी दर्शविली आहे. माजी न्यायमूर्ती मुकूल मुदगल यांनी पुढील चौकशीसाठी सीबीआयचे माजी अधिकारी एम.एल.शर्मा तसेच दिल्ली, चेन्नई, जयपूर आणि इतर पोलीस अधिकाऱयांच्या सहकाराची आवश्यकता लागेल असे न्यायालयासमोर म्हटले होते. त्यामुळे या प्रकरणाची पुढील सुत्रे मुदगल समितीकडे सोपविली जाण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे यासंदर्भात आता न्यायालयाच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे

Story img Loader