तब्बल २६ दिवस ‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणी पोलीस कोठडीची हवा खाणाऱ्या एस. श्रीशांत, अंकित चव्हाण आणि १४ सट्टेबाजांसह एकूण १९ आरोपींची मंगळवारी तिहार तुरुंगातून सुटका झाली. श्रीशांत आणि अंकितला दिल्ली न्यायालयाने सोमवारी जामीन दिला होता. श्रीशांत, अंकित आणि अजित चंडिला यांना दिल्ली पोलिसांनी मुंबईमधून अटक केली होती. त्यानंतर सुरुवातीला १३ दिवस श्रीशांतला पोलीस कोठडी ठोठावण्यात आली होती, तर अंकित चव्हाणला लग्नासाठी जामीन देण्यात आला होता.
सोमवारी दिल्ली न्यायालयाने ‘मोक्का’लावण्यात आलेल्या श्रीशांत, अंकित आणि अन्य १७ जणांना जामीन मंजूर केला होता. जामीन मंजूर करताना कोर्टाने सांगितले होते की, ‘‘प्रथमदृष्टय़ा पाहताना या आरोपींविरोधात पुरेसे पुरावे नाहीत. त्याचबरोबर त्यांचा संघटित गुन्हेगारीशी संबंध असल्याचे सिद्ध झालेले नाही.’’या दोन क्रिकेटपटूंबरोबर १४ सट्टेबाजांना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सोडण्यात आले. पोलिसांनी एकूण २६ जणांना अटक केली होती. त्यामधील १९ जणांना जामीन मिळाला असून सहा जणांना १८ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा निर्णय कोर्टाने दिला आहे. तर रमेश व्यास या सट्टेबाजाला १८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. चंडिलाबरोबरच अन्य सहा जणांनी अजूनही जामिनासाठी अर्ज केलेला नाही.बीसीसीआयच्या चौकशी समितीचे प्रमुख रवी सवानी यांनी सोमवारी आपला अहवाल बीसीसीआयकडे सादर केला होता. त्यामुळे श्रीशांत, अंकित आणि चंडिलाला बीसीसीआयच्या चौकशीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा