जावई गुरुनाथ मयप्पन ‘स्पॉट-फिक्सिंग’च्या जाळ्यात अडकल्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसआय) अध्यक्ष आणि चेन्नई सुपर किंग्जचे मालक एन. श्रीनिवासन हे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. चेन्नई सुपर किंग्जचा संघ सध्या ‘स्पॉट-फिक्सिंग’च्या आरोपांच्या केंद्रस्थानी असल्यामुळे श्रीनिवासन यांनी बीसीसीआयचे अध्यक्षपद सोडावे, यासाठी त्यांच्यावर सर्वच स्तरावरून दबाव वाढत आहे. शनिवारी दिवसभर श्रीनिवासन यांच्या राजीनाम्यासंदर्भातील घडामोडींना वेग आला होता. परंतु मी पद सोडणार नाही, असा पुनरुच्चार श्रीनिवासन यांनी करीत ‘कुर्सी नहीं छोडूंगा मै, बीसीसीआय प्रसिडेंट रहूंगा मै’ असा ‘मोडेन, पण वाकणार नाही’ बाणा दाखवला. श्रीनिवासन यांना हटविण्यासाठी विरोध गटसुद्धा सक्रिय होण्यासाठी सज्ज झाला होता. परंतु तूर्तास नेतृत्व श्रीनिवासन यांच्याकडेच राहू दे, असे धोरण त्यांनी स्वीकारले आहे.
मयप्पनला शुक्रवारी रात्री अटक झाल्यानंतर श्रीनिवासन यांनी शनिवारी सकाळी तातडीने मुंबई गाठली. मी काहीही चुकीचे केले नसल्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे श्रीनिवासन यांनी मुंबई विमानतळावर येताच प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट केले.
‘‘बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून मला कुणीही हुसकावून लावू शकत नाही. काही मंडळी माझ्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु राजीनाम्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही,’’ असे श्रीनिवासन यांनी सांगितले.
आयपीएलमधील सट्टेबाजी प्रकरणात मयप्पन अडकल्यानंतर ६८ वर्षीय श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्रतेने होऊ लागली आहे. त्यांनी स्वत:हून पद सोडले नाही, तर त्यांना राजीनामा देण्यासाठी भाग पाडण्याकरिता बीसीसीआयमधील एक गट सक्रिय झाल्याचे समजते. श्रीनिवासन यांची हकालपट्टी झाल्यास स्वच्छ प्रतिमा असलेले बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांच्याकडे प्रभारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवले जाईल, हीसुद्धा चर्चा होती. याचप्रमाणे हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे प्रतिनिधी शिवलाल यादव यांच्या नावाचीसुद्धा जोरदार चर्चा होती.
कोलकातामध्ये रविवारी आयपीएलचा अंतिम सामना रंगणार असताना या घडामोडींना वेग आला आहे. या पाश्र्वभूमीवर श्रीनिवासन कोलकाताला जाण्याची शक्यता आहे. येत्या सप्टेंबरमध्ये श्रीनिवासन यांच्या पदाचा कार्यकाळ संपणार आहे, मात्र घटनेतील तरतुदीनुसार ते पुढील वर्षीच्या सप्टेंबपर्यंत पदावर राहू शकतात. परंतु सद्यस्थितीत ते कठीण दिसते आहे. बीसीसीआयच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याचे कोणतेही संकेत मिळत नाही.
तूर्तास, श्रीनिवासन यांचे अध्यक्षपद शाबूत!
कितीही दडपण आणले, तरी सध्या बीसीसीआयचे अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांचे पद काढून घेणे शक्य नसल्याचे लक्षात येताच विरोधी गटाने त्यांचीच सत्ता पुढे चालू ठेवण्यास प्राधान्य दिले आहे. मात्र हा विरोधी गट कासवाच्या गतीने शर्यत जिंकण्याचा प्रयत्न करीत आहे. श्रीनिवासन यांच्याकडे असलेले विशेष अधिकार हे त्यांना सध्या तरी या पदावरून हटवू शकत नाहीत, हे त्यांच्या विरोधकांच्या लक्षात आले आहे. इंद्रजित बिंद्रा यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आयपीएलचे प्रमुख राजीव शुक्ला यांनी शनिवारी येथे मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवासन व माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांची भेट घेतली. या भेटीपूर्वी शुक्ला यांनी दालमिया यांच्याबरोबर एक तास सविस्तर चर्चा केली असल्याचे समजते. त्यांची ही भेट खूप महत्त्वाची मानली जात आहे.
दरम्यान, कोलकातामध्ये दालमिया यांनी आयोजित केलेल्या मेजवानीला बीसीसीआयचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. मंडळाचे उपाध्यक्ष अरुण जेटली व सहसचिव अनुराग ठाकूर हे या मेजवानीला उपस्थित नव्हते. तसेच झारखंड, त्रिपुरा व ओरिसा या राज्यांचेही प्रतिनिधी उपस्थित नव्हते. उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांमधील बरेचसे पदाधिकारी श्रीनिवासन यांच्या गटातील आहेत. सध्या तरी श्रीनिवासन यांना पदावरून हटविणे शक्य नाही, असेच मत या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. मय्यपन यांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याबाबत पावले उचलावी असे त्यांच्या विरोधातील संघटक विचार करीत आहेत. श्रीनिवासन यांच्या अध्यक्षपदाची मुदत सप्टेंबरमध्ये संपत आहे. दरम्यान, मंडळाचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांनी आपण प्रभारी अध्यक्ष होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा