‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणाचा फास जसजसा आवळला जात आहे, तशीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याची मागणी अधिक जोर धरू लागली आहे. पण राजीनाम्याच्या मागण्यांचा समाचार घेत श्रीनिवासन आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा बुधवारीही स्पष्ट केले.
‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणात जावई गुरुनाथ मयप्पन आणि संघ चेन्नई सुपर किंग्ज यांचे नाव आल्याने या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत श्रीनिवासन यांनी अध्यक्षपदापासून लांब राहावे’ असे वक्तव्य बुधवारी सकाळी आयपीएलचे प्रमुख राजीव शुक्ला यांनी केले होते. त्यानंतर दुपारी मुंबईतील बीसीसीआयच्या मुख्यालयात श्रीनिवासन आले असताना प्रसारमाध्यमांकडे ते म्हणाले, ‘‘शुक्ला यांनी नवीन काहीच सांगितलेले नाही आणि याबद्दल त्यांनी रविवारीच आपले मत मांडले होते.’’
‘‘मी शुक्ला यांची मुलाखत पाहिली. ते असे म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आयोगाची नियुक्ती केली आहे आणि ही चौकशी पूर्ण होईपर्यंत आपण या पदापासून लांब राहावे. कोलकाता येथील पत्रकार परिषदेच्या वेळीसुद्धा हे त्यांनी मला सांगितले होते,’’ असे श्रीनिवासन यावेळी म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, ‘‘कोलकात्यामधील पत्रकार परिषदेमध्ये मी स्पष्ट केले होते की, आयोगाशी माझा काहीही संबंध नसेल आणि त्यामध्ये मी ढवळाढवळ करणार नाही. ज्या कोणाची आयोगासाठी नियुक्ती होईल आणि जो त्यांचा अहवाल असेल त्याच्याशी माझे घेणे-देणे नसेल. शुक्ला यांनी त्या दिवशी जे सांगितले ते पुन्हा एकदा सांगितले आहे आणि यामध्ये काही वेगळे किंवा नवीन नाही.’’चौकशी आयोगाबद्दल बोलताना श्रीनिवासन पुढे म्हणाले की, ‘‘या आयोगाशी माझा काहीही संबंध नाही, हा आयोग स्वतंत्र असेल. त्यांच्याकडे अधिकार आहेत आणि त्यांना शिक्षा करण्याचा हक्कही असेल. त्यामुळे आता काय होईल, याकडे सर्वाचेच लक्ष लागून राहिले आहे.’’
बीसीसीआयचे अधिकारी ज्योतिरादित्य सिंधिया आणि हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जी. गोविंद यांनी श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती, यावर ते म्हणाले की, ‘‘कोणत्याही वैयक्तिक मागणीवर मी प्रतिक्रिया देणार नाही.’’‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरण सर्वापुढे आल्यापासून बऱ्याच जणांनी श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याची मागणी केली असली, तरी आपली हटवादी भूमिका न सोडून ते आपल्या मतावर अजूनही ठाम असल्याचेच चित्र बुधवारीही पाहायला मिळाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा