‘राजीनामा द्या’ ही विरोधकांची होणारी मागणी, काही जणांनी दिलेले पदाचे राजीनामे आणि काही जणांनी दिलेली राजीनाम्याची धमकी, हे सारे आपल्या विरोधात घडत असले तरी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष एन. श्रीनिवासन मात्र शांत आणि संयत होते. कारण कुणीही नियमावर बोट ठेवून आपले काहीही वाकडे करू शकणार नाही, हे त्यांना चांगलेच माहिती होते. पण वाढत्या दबावामुळे पदत्याग न करता वेळ काढण्यासाठी काय करता येईल, याची रणनीती श्रीनिवासन यांनी जगमोहन दालमिया यांच्या मदतीने आखली आणि त्यामध्ये ते यशस्वीही झाले. नियमांनुसार अध्यक्षपदापासून श्रीनिवासन यांना दूर करता येणार नाही, हे विरोधकांनी माहिती होते आणि त्यामुळेच त्यांचा विरोध मावळला. कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्ये कुणीही त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली नाही.
आयपीएलच्या अंतिम फेरीच्या वेळी श्रीनिवासन आणि दालमिया यांची भेट झाली आणि तिथेच या रणनीतीचा पाया रचला गेला. रविवारच्या बैठकीच्या पूर्वी या दोघांनी चर्चा करत आपल्या रणनीतीवर शिक्कामोर्तब केले आणि तसाच निर्णय पाहायला मिळाला.
बीसीसीआयची नियमावली काय सांगते
विशेष सर्वसाधारण सभेशिवाय नियमानुसार अध्यक्षांना काढता येऊ शकत नाही, असा बीसीसीआयचा नियम आहे. ही सभा बोलवण्याचा अधिकार अध्यक्षांना असल्याने, बीसीसीआयची विशेष सभा बोलवली जाणार नसल्याचे स्पष्ट होते. श्रनिवासन यांना पदावरून काढण्यासाठी ३/४ मते त्यांच्या विरोधात असणे गरजेचे होते, पण प्रत्यक्ष परिस्थिीती ही श्रीनिवासन यांच्या बाजूने होती.

Story img Loader