अचूक निर्णयांसाठी पाकिस्तानचे पंच असद रौफ ओळखले जातात. मात्र फिक्सिंग प्रकरणात रौफ यांची मर्जी संपादण्यासाठी उधळलेल्या दौलतजादाचे वर्णन साऱ्यांनाच अचंबित करणारे आहे. फिक्सिंगचा विळखा केवळ खेळाडू, सट्टेबाज, संघमालक यांच्यापुरता नसून खेळाचे नियमांनुसार आयोजन करणारे पंचही त्यात सामील असल्याचे तपशीलवार सिद्ध झाले आहे.
‘अदिदास’ या कंपनीचे प्रत्येकी १५ हजार रुपये किमतीची पादत्राणांचे सहा जोड, प्रत्येकी १० ते १५ हजार रुपये किमतीची आठ चामडय़ाची पादत्राणे, २५ हजार रुपये प्रत्येकी असणाऱ्या लेव्ही, हॅलो आणि बरून या कंपन्यांच्या १३ जीन्स, तीन ते पाच हजार किंमत असणारे बॉस-नाईके कंपन्यांचे १६ टी-शर्ट्स, मुंबई इंडियन्स आणि पुणे वॉरियर्स संघाच्या पाच जर्सी, प्रत्येकी २५ ते ३० हजार किमतीचे सात महिलांचे ड्रेस मटेरियल, प्रत्येकी पाच हजार किमतीचे नऊ चामडय़ाचे पट्टे.. एवढा सारा खजिना आयपीएलमध्ये कार्यरत पाकिस्तानी पंच असद रौफ यांच्यासाठी रिता करण्यात आला.
डोळे दिपवणाऱ्या महागडय़ा वस्तू पुरवण्यापूर्वीच रौफ यांना पाच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि घडय़ाळे देण्यात आल्याचेही उघड झाले आहे. रौफ ही सगळी मालमत्ता घेऊन मायदेशी रवाना झाले. मुंबई गुन्हे शाखेच्या मालमत्ता विभागाकडे या दागिने आणि घडय़ाळांच्या पावत्यांचा तपशील आहे.
रौफ यांच्या खरेदीसाठी सट्टेबाज पवन जयपूरने विंदूला एक लाख रुपये दिल्याचेही स्पष्ट झाले आहे. विंदूतर्फे प्रेम तनेजा याने रौफ यांना खरेदीदरम्यान सोबत केल्याचेही समोर आले आहे. दागिने आणि घडय़ाळे वगळता रौफ यांना पुरवण्यात आलेली दौलतजादा मुंबई गुन्हे शाखेच्या ताब्यात आहे.

Story img Loader