आयपीएल स्पॉट-फिक्सिंगप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या तीन साथीदारांवर अजामीनपात्र वॉरंट दाखल केले आहे. या तिघांनी स्पॉट फिक्सिंगप्रकरणी महत्त्वाची भूमिका निभावल्याचे पोलिसांनी सांगितल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
पाकिस्तानस्थित डॉ. जावेद चुटानी, सलमान ऊर्फ मास्टर आणि ईथेशाम या तिघांविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी दिल्ली पोलिसांच्या विशेष विभागाने न्यायालयाकडे विनंती केली होती. हे तिघेही दाऊदचे जवळचे साथीदार असून ते कराची आणि लाहोरमध्ये असून त्यांनी स्पॉट फिक्सिंग प्रकरणात महत्त्वाची भूमिका निभावल्याचे पोलिसांनी सांगितले.
पाकिस्तानात असलेल्या आरोपींसाठी वॉरंट जारी करणे शक्य नाही, त्यामुळे या तीन आरोपींसाठी खुले अजामीनपात्र वॉरंट जारी केल्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेश शर्मा यांनी सांगितले.
याव्यतिरिक्त संजय अगरवाल, मोहम्मद शकील आमीर, प्रवीण कुमारजी ठक्कर आणि संदीप शर्मा या सट्टेबाजांविरोधात अजामीनपात्र वॉरंट दाखल करावा, यासाठी पोलिसांनी स्वतंत्र याचिका न्यायालयात दाखल केली होती. स्पॉट फिक्सिंगच्या तपासादरम्यान या चौघांची नावे उघड झाली होती. मात्र अटक टाळण्यासाठी हे चौघेही फरार आहेत. न्यायालयाने ही विनंती मान्य करत या चौघांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट दाखल केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा