आयपीएल फिक्सिंगसंदर्भात चेन्नईला गेलेल्या मुंबई पोलिसांच्या हाती गुरुनाथ मय्यपनची महत्त्वपूर्ण डायरी लागली आहे. या डायरीत अनेक खेळाडूंचे क्रमांक आणि माहिती असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर आता मुंबई पोलिसांनी सट्टेबाजीसंदर्भात विक्रम अग्रवाल ऊर्फ विक्टर या हॉटेल व्यावसायिकाचा शोध सुरू केला आहे.
सट्टेबाजी प्रकरणात मुंबई पोलिसांनी चेन्नई सुपर किंगचा मालक आणि बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ याला अटक करून चौकशी सुरू केली आहे. रविवारी चेन्नईला गुरुनाथच्या घरी मुंबई पोलिसांनी जाऊन घराची झडती घेतली. तीत पोलिसांना महत्त्वपूर्ण डायरी हाती लागली आहे. या डायरीत अनेक क्रिकेटपटूंचे क्रमांक आणि सट्टेबाजी संदर्भातील महत्त्वाची माहिती हाती आली आहे. या झडतीत पोलिसांना गुरुनाथची १९० व्हिजिटिंग कार्ड्स,  ‘चेन्नई सुपर किंग्स’चे १४०० लोगो, ४७ टी शर्टस आदी साहित्य सापडले आहे. पोलिसांनी गुरुनाथची तीन सीम कार्डस जप्त केले असून एक चेन्नई सुपर किंग्सचे, एक त्याची कंपनी एव्हीएम प्रॉडक्शनच्या नावाचे तर एक त्याच्या स्व:च्या नावाचे आहे.

पोलिसांना हवीय टिक्कूची पोलीस कोठडी
दिल्ली पोलिसांनी अटक केलेला सट्टेबाज टिक्कू उर्फ अश्विन अग्रवाल याची पोलीस कोठडी मुंबई पोलिसांना हवी आहे. अनेक सामन्यांदरम्यान टिक्कू विंदूच्या संपर्कात होता. त्यामुळे त्याच्या चौकशीसाठी पोलिसांना टिक्कू हवा आहे. मंगळवारी टिक्कूची दिल्लीतील पोलीस कोठडी संपत आहे. मुंबईतून टिक्कूला ताब्यात घेण्याची न्यायालयाची ऑर्डर मुंबई पोलिसांनी मिळवली असून ती घेऊन पोलीस मंगळवारी दिल्लीला रवाना होत आहे. जर दिल्लीत त्याच्या पोलीस कोठडीत वाढ झाली तर पुन्हा प्रयत्न करू असे सहपोलीस आयुक्त हिमांशू रॉय यांनी सांगितले.  दरम्यान, मुंबई पोलिसांच्या मालमत्ता विभागाने पुण्याहून दिनेश शर्मा आणि किशोर पबलानी या दोन सट्टेबाजांना अटक केली आहे. रमेश व्यासच्या माध्यमातून हे दोन सट्टेबाज पाकिस्तानमधील सट्टेबाजांच्या संपर्कात होते.

विक्रम अग्रवालला समन्स
पोलिसांच्या चौकशीत अचानक विक्रम अग्रवाल उर्फ विक्टर हे नाव समोर आले आहे. हा विक्टर मूळ चेन्नईचा असून गुरुनाथचा जुना मित्र आहे. त्याचे मुंबईत रॅडिसन ब्लू नावाचे थ्री स्टार हॉटेल आहे. आयपीएल दरम्यान विंदू, मय्यपन आणि सट्टेबाजांच्या संभाषणात त्याचे नाव पोलिसांना आढळले आहे. विंदूच्या मार्फत मुली पुरविणे, राहण्याची व्यवस्था करणे आदीबाबत त्याचा सहभाग असावा, असा संशय पोलिसांना आहे. एकाच वेळी तो विंदू, मय्यपन आणि ज्युपीटर या सट्टेबाजांना ओळखत असल्याने त्याच्याबाबत गूढ निर्माण झाले असून त्याला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी पोलिसांनी समन्स बजावले आहे. मंगळवारी सकाळी ११ ते ५ या वेळेत त्याला मुंबई गुन्हे शाखेत हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे.

Story img Loader