ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टिरक्षक आणि फलंदाज अॅडम गिलख्रिस्टने इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) मालकांच्या वाढत्या मक्तेदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. आयपीएल टीमचे मालक जगभरात टीम विकत घेतायत, हे धोकादायक असल्याचे त्यानं म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नर यंदाच्या हंगामात बिग बॅश लीग (BBL)खेळण्याऐवजी अधिक फायदा मिळवून देणारी UAE T20 लीगमध्ये खेळू शकतो, अशा वृत्तांच्या पार्श्वभूमीवर गिलख्रिस्टनं ही टिप्पणी केली आहे.
मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या तीन आयपीएल फ्रँचायझींनी UAE T20 लीगमधील संघांमध्ये गुंतवणूक केली आहे. आयपीएलच्या मालकांचं जागतिक क्रिकेटमध्ये वाढणारं वर्चस्व धोकादायक असल्याचं मत गिलख्रिस्टनं मांडलं आहे. तो एसईएनच्या रेडिओ कार्यक्रमात बोलत होता. “डेव्हिड वॉर्नरनं बीबीएलमध्ये खेळावं, यासाठी आपण त्याला जबरदस्ती करू शकत नाही. यामध्ये केवळ वॉर्नरच नव्हे तर इतर खेळाडूंचाही समावेश आहे. कॅरिबियन प्रीमियर लीगमध्येही अनेक आयपीएल संघांच्या मालकांनी गुंतवणूक केली आहे” असंही गिलख्रिस्टनं सांगितलं.
पुढे गिलख्रिस्टनं म्हटलं की, “हा काहीसा धोकादायक ट्रेंड आहे, कारण ते केवळ खेळाडूंची मालकी विकत घेत नाही, तर ते त्यांच्या प्रतिभेची मक्तेदारीदेखील विकत घेत आहेत. त्यांनी कुठे खेळावं आणि कुठे खेळू नये, हेही तेच ठरवत आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डानं या प्रकरणाकडे गांभीर्यानं लक्ष घातलं पाहिजे. अन्यथा भविष्यात इतरही अनेक खेळाडू वॉर्नरच्या पावलावर पाऊल ठेवू शकतात, असा इशारा गिलख्रिस्टने दिला आहे.
उद्या जर एखादा खेळाडू म्हणाला की, मी ऑस्ट्रेलियन संघासाठी क्रिकेट खेळू शकत नाही, मला भारतीय लीग सामन्यात खेळायचं आहे, अशावेळी आपण संबंधित खेळाडूला रोखू शकत नाही. कारण कुठे खेळायचं? हा त्याचा विशेषाधिकार आहे.
अॅडम गिलख्रिस्टने ऑस्ट्रेलियन संघाकडून ९६ कसोटी आणि २८७ एकदिवसीय क्रिकेट सामने खेळले आहेत. यापूर्वी तो डेक्कन चार्जर्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबकडून आयपीएलमध्ये खेळला आहे. २००९ मध्ये डेक्कन चार्जर्सने आयपीएलचे जेतेपद पटकावलं होतं, त्यावेळी गिलख्रिस्ट हा संघाचा कर्णधार होता.