भारत आणि चीन यांच्यात गलवान खोऱ्यात सुरु असलेल्या संघर्षामुळे बीसीसीआयने चिनी मोबाईल कंपनी VIVO सोबतचा करार एक वर्षभरासाठी स्थगित केला. तेराव्या हंगामाला स्पॉन्सरशिप देण्यासाठी बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी निवीदा मागवल्या होत्या. त्याचा अंतिम निकाल मंगळवारी लागणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार Tata Sons कंपनी तेराव्या हंगामाच्या स्पॉन्सरशिपच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचं कळतंय. VIVO आणि IPL यांच्यात ५ वर्षांसाठी २ हजार १९९ कोटींचा करार झाला होता. प्रत्येक हंगामासाठी VIVO कंपनी बीसीसीआयला ४४० कोटींचा निधी देत होती. परंतू गलवान खोऱ्यातील संघर्षात २० भारतीय सैनिकांना हौतात्म्य पत्करावं लागलं. यानंतर देशभरात चिनी वस्तूंविरोधत वातावरण तयार झालं. ज्यानंतर जनभावनेचा आदर करत बीसीसीआयने VIVO सोबतचा करार एका वर्षासाठी स्थगित केला.
Tata Sons चं पारडं जड, इतर कंपन्यांकडूनही कडवी टक्कर –
तेराव्या हंगामासाठी स्पॉन्सरशिपचं कंत्राट मिळणाऱ्या कंपनीसोबत ४ महिन्यांचा करार केला जाणार आहे. ३१ डिसेंबर २०२० पर्यंत हा करार लागू असेल. बीसीसीआयने निवीदा मागवताना ज्या कंपनीची वार्षिक उलाढाल ३०० कोटींपेक्षा जास्त असलेल्या कंपनीनेच निवीदा पाठवावी अशी अट घातली होती. टाटा सन्स व्यतिरीक्त, Byju’s आणि Unacademy हे दोन ब्रँड शर्यतीत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही कंपन्यांनी सर्वाधिक किंमत देण्याची तयारी दाखवली आहे.
यासोबतच Dream 11, पतंजली, Jio या कंपन्याही शर्यतीत आहेत. मात्र स्पॉन्सरशिपचे हक्क देताना सर्वात जास्त बोली लावणाऱ्या कंपनीला हक्क मिळणार नाहीत हे बीसीसीआयने याआधीच स्पष्ट केलं होतं. हक्क मिळणाऱ्या कंपनीचा IPL या ब्रँडला कसा फायदा होईल आणि इतर बाबींचा विचार करुन नवीन स्पॉन्सरबद्दल निर्णय घेतला जाईल असं बीसीसीआयने स्पष्ट केलं होतं. त्यामुळे तेराव्या हंगामाच्या स्पॉन्सरशिपचे हक्क कोणाच्या पदरात पडतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.