टी २० ब्लास्ट २०२२ स्पर्धेतील दक्षिण गटात रविवारी रात्री (१९ जून) एक उच्च धावसंख्येचा सामना बघायला मिळाला. चेम्सफोर्ड येथील काउंटी मैदानावर सॉमरसेट आणि एसेक्स यांच्यात हा सामना झाला. रिले रोसौव्ह आणि कर्णधार टॉम अॅबेल यांनी सॉमरसेटच्या संघाला विजय मिळवून दिला. रिले रोसौव्हने ३६ चेंडूत पाच चौकार आणि सात षटकारांच्या मदतीने नाबाद ८५ धावा केल्या. इंडियन प्रीमियर लीगच्या लिलावात ‘अनसोल्ड’ राहिलेल्या रिलेने अवघ्या १९ चेंडूतच आपले अर्धशतक साजरे केले.
१९ चेंडूत अर्धशतक करणाऱ्या रिलेने यावर्षी इंडियन प्रीमियर लीगच्या लिलावात भाग घेतला होता. त्याची मूळ किंमत एक कोटी रुपये होती. मात्र, अश्चर्याची गोष्ट म्हणजे दक्षिण आफ्रिकेच्या रिलेला कोणीही खरेदीदार मिळाला नव्हता. त्याच रिलेने टी २० ब्लास्ट लीगच्या सामन्यात चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. संपूर्ण सामन्यादरम्यान दोन्ही संघांनी ३० चौकार आणि २१ षटकार मारले. विजय मात्र, सॉमरसेटच्या वाट्याला आला. त्यांनी एसेक्सचा आठ गडी राखून पराभव केला.
हेही वाचा – युवराज सिंगच्या ‘पुत्तर’चं नाव ऐकलंत का? फादर्स डेच्या दिवशी केला खुलासा
सॉमरसेटचा हा या स्पर्धेतील सातवा विजय असून गुणतालिकेत ते दुसऱ्या क्रमांकावर पोहचले आहे. सॉमरसेटने आतापर्यंत नऊ सामने खेळून १४ गुण मिळवले आहेत. तर, रिले रोसौव्हने आतापर्यंत नऊ डावांत ७२.९च्या सरासरीने आणि १९२.५ च्या स्ट्राइक रेटने ४३७ धावा केल्या आहेत. त्यात चार अर्धशतकांचाही समावेश आहे. टी २० ब्लास्टच्या या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये तो अव्वल आहे.