आयपीएलचे काही सामने भारतात खेळवण्यासाठी उत्सुक असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा जाहीर होईपर्यंत थांबण्याची भूमिका घेतली आहे. या तारखा घोषित झाल्यानंतरच स्पध्रेची ठिकाणे निश्चित करण्यात येतील. सुरक्षेच्या कारणास्तव संयोजकांना या स्पध्रेतील काही सामने परदेशात खेळवावे लागणार असले तरी मतमोजणीची प्रक्रिया १५ मेपर्यंत संपल्यास फ्रेंचायजींच्या विनंतीनुसार उर्वरित स्पर्धा भारतात होऊ शकेल. या परिस्थितीत स्पध्रेचा पहिला टप्पा बांगलादेश किंवा संयुक्त अरब अमिरातीमध्ये होईल. याचप्रमाणे निवडणूक प्रक्रिया मेअखेपर्यंत लांबल्यास आयपीएलची संपूर्ण स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत होईल, अशी रणनीती बीसीसीआयने निश्चित केली आहे.
एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या देशातील निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर आयपीएल स्पध्रेला सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात येणार नाही, असे केंद्रीय गृह खात्याने स्पष्ट केले होते. याबाबत बीसीसीआयच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत चर्चा झाली. आयपीएल ९ एप्रिल ते ३ जून या कालावधीत होत असून, निवडणुकासुद्धा याच काळात होणार आहेत.
‘‘सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम घोषित झाल्यावर आम्ही आयपीएलची ठिकाणे निश्चित करू आणि गरज भासल्यास स्पध्रेतील काही सामने परदेशात खेळवू. दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि संयुक्त अरब अमिराती या देशांनी सामन्यांच्या आयोजनासाठी उत्सुकता दर्शवली असून, आयपीएलचे प्रमुख रणजिब बिस्वाल त्यांच्या संपर्कात आहेत,’’ अशी माहिती बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी बैठकीनंतर दिली.
आयपीएलच्या दुसऱ्या मोसमाचे यजमानपद यशस्वीपणे सांभाळल्यामुळे दक्षिण आफ्रिका सामन्यांच्या संयोजनाच्या शर्यतीत अग्रेसर आहे. संयुक्त अरब अमिरातीनेसुद्धा सामन्यांच्या आयोजनाची तयारी दर्शवली आहे. परंतु पुरस्कर्त्यांच्या प्रचंड दडपणामुळे आयपीएल स्पध्रेतील बहुतांशी सामने भारतात व्हावे, यासाठी बीसीसीआय आग्रही आहे.
आयपीएलसारख्या स्पध्रेचे यजमानपद सांभाळण्याची दक्षिण आफ्रिकेकडे चांगली क्षमता आहे. द. आफ्रिकेत चांगली मैदाने आहेत, याचप्रमाणे सामन्यांच्या वेळा भारतीय दर्शकांना अनुकूल अशा आहेत. संयुक्त अरब अमिरातीमध्ये शारजाशिवाय दुबई आणि अबू धाबीमध्ये दोन क्रिकेट स्टेडियम्स आहेत.
निवडणुकीच्या तारखा ५ मार्चला जाहीर होणार आहेत, अशी माहिती बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिली. जर १५ मेपर्यंत निवडणूक प्रक्रिया संपली तर स्पध्रेतील पहिल्या टप्प्याचे सामने संयुक्त अरब अमिराती किंवा बांगलादेशमध्ये होतील. जेणेकरून संयोजनाची समस्या येणार नाही. मात्र मेअखेपर्यंत निवडणूक प्रक्रिया सुरू राहिली तर आयपीएलची संपूर्ण स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत हलवण्यात येईल,’’ असे सूत्रांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा