सर्वोच्च न्यायालयाच्या समितीच्या निर्णयाने आयपीएलला मोठा धक्का बसला असला तरी ही स्पर्धा आठ संघांनिशी झोकात पुनरागमन करेल, असा विश्वास आयपीएलचे आयुक्त राजीव शुक्ला यांनी म्हटले आहे.
‘‘आम्ही नेहमीच आयपीएलच्या हिताचा विचार करत आलो आहोत आणि पुढची स्पर्धा आम्हाला मोठे यश मिळवून देईल. आयपीएल सुदृढ असून या निर्णयाचा आयपीएलवर विपरीत परिणाम होणार नाही. आयपीएल सहा संघांनिशी खेळवण्यात येणार नाही, आठ संघांना बरोबर घेऊनच ही स्पर्धा खेळवण्याचा आमचा मानस आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,’’ असे शुक्ला म्हणाले.
आयपीएलपुढे आता बरेच पर्याय आहे आणि या पर्यायांचा मुंबईमध्ये होणाऱ्या संचालन समितीच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात येईल, असे शुक्ला यांनी सांगितले. याबाबत शुक्ला म्हणाले की, ‘‘आमच्यापुढे आता बरेच पर्याय खुले आहेत आणि रविवारी होणाऱ्या बैठकीमध्ये आम्ही त्यावर चर्चा करणार आहोत. यामधील एक पर्याय म्हणजे बीसीसीआयने हे दोन्ही संघ घ्यावेत आणि चालवावेत. त्यानुसार जबाबदार व्यक्तींची नियुक्तीही केली जाईल.’’
बीसीसीआयने हे दोन्ही संघ आपल्या आधिपत्याखाली घेतल्यावर परस्पर हितसंबंध जपले जाणार नाहीत का, असा प्रश्न विचारल्यावर शुक्ला म्हणाले की, ‘‘परस्पर हितसंबंध जपले जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही, कारण गेली बरीच वर्षे बीसीसीआयवर लक्ष ठेवत आहे. खेळाडूंचा लिलाव पारदर्शक पद्धतीने होणे आणि संघाचे योग्य व्यवस्थापन करणे, या दोन गोष्टी आमच्यासाठी महत्त्वाच्या असतील.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा