‘‘ज्या न्यायाधीशांनी हा निर्णय दिला आहे, ते न्यायाधीश आपल्या देशाचे माजी मुख्य न्यायाधीश होते. साहजिकच त्यांचा निर्णय सर्वोत्तमच असणार आहे. अन्य संघांमधील खेळाडूंनी त्यांच्या निर्णयाचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे. केवळ आयपीएल स्पर्धेला संपूर्ण दोष देणे अयोग्य होईल. जे काही घडले आहे ते या दोन फ्रँचाइजींमधील काही खेळाडूंच्या चुकांमुळे घडले आहे. २०१३ मध्येही असे काही प्रकार घडले होते, मात्र तरीही या स्पर्धेची लोकप्रियता कमी झालेली नाही. अनेक युवा खेळाडूंना या स्पर्धेद्वारे भरपूर अनुभव व भारतीय संघाची दारे खुली होत आहेत, असे भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी सांगितले.
आयपीएलच्या भवितव्याबाबत गावसकर यांनी सांगितले की, ‘‘जरी हे दोन संघ बडतर्फ करण्यात आले असले तरी पुढच्या आयपीएलकरिता अजून आठ महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे नवीन दोन फ्रँचाइजी निवडण्यासाठी संघटकांना पुरेसा वेळ मिळणार आहे.’’
चेन्नई सुपर किंग्ज संघावर दोन वर्षांकरिता बंदी घालण्यात आल्यामुळे त्यांचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या अनुपस्थितीत आयपीएल क्रिकेट स्पर्धा अपूर्णच आहे, असेही भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी सांगितले.
‘‘धोनीखेरीज आयपीएल स्पर्धा परिपूर्ण होऊच शकत नाही. मात्र तो आता ३४ वर्षांचा आहे. त्यामुळे आणखी तीन-चार वर्षांत त्याने क्रिकेटला रामराम केला असता. तरीही आयपीएलमध्ये त्याची अनुपस्थिती ही मनाला क्लेशदायक गोष्ट असणार आहे. चेन्नई व राजस्थान रॉयल्स या संघांमधील खेळाडूंसाठी दोन वर्षे हा अतिशय कठीण काळ असणार आहे. या दोन्ही संघांवर झालेल्या कारवाईकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा