Aakash Chopra Vs Sanju Samson : राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैद्राबाद यांच्यात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात अखेर हैद्राबादने बाजी मारली. अब्दुल समदने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून हैद्राबादला विजय मिळवून दिला. संदीप शर्माने शेवटचा चेंडू नो बॉल फेकल्याने समदला जीवदान मिळालं आणि हैद्राबादला एक अतिरिक्त चेंडू खेळायला मिळाला. लाखो चाहत्यांचा श्वास रोखून धरणाऱ्या सामन्यात राजस्थानला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर समालोचक आणि भारताचा माजी क्रिकेटर आकाश चोप्राने कर्णधार संजू सॅमसनच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. आकाशने ट्वीट करत सॅमसनच्या एका निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
आकाशने ट्वीट करत म्हटलं, धावांचं लक्ष्य वाचवण्यासाठी २० षटकाच्या तुलनेत १९ वे षटक अधिक महत्वाचं आहे. ओबेड मकॉय किंवा संदीप शर्माला ते षटक टाकायचं होतं. कुलदीपबाबत मी काही बोलणार नाही. परंतु, राजस्थानकडे दोन अनुभवी गोलंदाज होते. आता फक्त तीन सामने राहिले आहेत. राजस्थानचा संघ फक्त १६ गुणांपर्यंत पोहचू शकतं. तर दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैद्राबादलाही प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी आहे.
युवा वेगवान गोलंदाज कुलदीप यादवने राजस्थानसाठी १९ वे षटक फेकलं. त्याच्या गोलंदाजीवर ग्लेन फिपिप्सने आक्रमक फलंदाजी करत पहिल्या चार चेंडूवर २२ धावा कुटल्या आणि सामन्याचं चित्र बदललं. शेवटच्या दोन षटकात हैद्राबादला विजयासाठी ४१ धावांची आवश्यकता होती. अशातच संजू सॅमसनने अनुभवी गोलंदाज ओबेड मकॉय किंवा संदीप शर्माला गोलंदाजी दिली नाही, त्यामुळे राजस्थानला पराभवाचा सामना करावा लागला.