Abhishek Sharma First IPL Century Celebration: अभिषेक शर्माने पंजाब किंग्सविरूद्ध सामन्यात अनोख्या अंदाजात फलंदाजी करत सर्वांनाच आश्चर्यचकित केलं. पहिल्याच चेंडूपासून चौकार-षटकारांचा पाऊस पाडत अभिषेकने आपल्या वादळी फलंदाजीला सुरूवात केली आणि संघासाठी एक रेकॉर्डब्रेकिंग विजयी खेळी साकारत तो माघारी परतला. पण यादरम्यान त्याच्या शतकाच्या सेलिब्रेशनने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

पंजाब किंग्सने या सामन्यात दिलेल्या २४६ लक्ष्याचा पाठलाग करताना अभिषेक शर्माने वादळी फलंदाजी केली. अभिषेक शर्माने १९ चेंडूत अर्धशतक तर ४० चेंडूत शतक झळकावलं. तर ट्रॅव्हिस हेडबरोबर त्याने १७१ धावांची सलामीची भागीदारी रचली. अभिषेक शर्माने शतक झळकावताच त्याने सिंहासारखी गर्जना करत आनंद साजरा केला. यानंतर त्याने एक चिठ्ठी काढत सर्वांना मैदानात दाखवली.

अभिषेक शर्माने ५५ चेंडूत १४१ धावांची खेळी केली. या विक्रमी खेळीत त्याने १४ चौकारांव्यतिरिक्त १० षटकारही मारले. अभिषेकने २५६.३६ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत सर्वांना मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी केली. सतराव्या षटकात अर्शदीप सिंगने अभिषेकला झेलबाद केले. आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद शतक करणारा अभिषेक सहावा फलंदाज ठरला. तर आयपीएलमध्ये सर्वात मोठी धावसंख्या रचणारा तो पहिला भारतीय फलंदाज आहे.

खरंतर, शतकानंतर अभिषेकने खिशातून एक चिठ्ठी काढली आणि एका खास पद्धतीने सेलिब्रेशन केलं. अभिषेकच्या त्या चिठ्ठीवर लिहिलं होतं की हे शतक ऑरेंज आर्मीसाठी आहे. विशेष म्हणजे मैदानावर उपस्थित असलेले श्रेयस अय्यर आणि युजवेंद्र चहल यांनीही अभिषेककडून ती चिठ्ठी मागितली आणि ती वाचली. या संपूर्ण घटनेचा व्हीडिओ आणि फोटो सध्या व्हायरल होत आहे.

अभिषेक शर्माच्या या वादळी शतकासह सनरायझर्स हैदराबाद संघाने एक अनोखा आणि ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. २४६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादने पंजाब किंग्सवर १० चेंडू राखून आणि ८ विकेट्सने अनपेक्षित विजयाची नोंद केली. सलग चार सामन्यांमध्ये पराभूत झाल्यानंतर हैदराबादने जोरदार पुनरागमन केलं आहे.