IPL 2025 SRH vs PBKS: पंजाब किंग्स वि. सनरायझर्स हैदराबाद सामन्यात धावांचा पाऊस पडताना दिसत आहे. फलंदाज फक्त चौकार-षटकारांचा पाऊस पाडत आहे. पहिल्या डावात फलंदाजी करत पंजाब किंग्सच्या संघाने २० षटकांत २४६ धावांचा डोंगर उभारला. तर हैदराबाद संघही पहिल्या षटकापासून वादळी फलंदाजी करताना दिसत आहे. पण पंजाब किंग्स संघाबरोबर एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला, पाहूया नेमकं काय झालं?
पहिल्याच षटकापासून हैदराबादचे सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी आपल्या विस्फोटक अंदाजात वादळी फटकेबाजीला सुरूवात केली. हेडने पहिल्या षटकात ९ धावा केल्या. तर अभिषेक शर्माने दुसऱ्या षटकात १९ धावा केल्या. नंतर तिसऱ्या षटकात हेडने पुन्हा १२ धावा कुटल्या. यासह हैदराबादने ३ षटकांत ४० धावांचा पल्ला गाठला. खरा ट्विस्ट आला तो चौथ्या षटकात.
चौथ्या षटकात यश ठाकूर गोलंदाजीला आला. त्याच्या दुसऱ्या चेंडूवर अभिषेक शर्माने चौकार-षटकार लगावला. तर ठाकूरने चौथा चेंडू टाकला आणि अभिषेक शर्माने मोठा फटका खेळला पण तो बाऊंड्री लाईनजवळ तो झेलबाद झाला. झेलबाद होताच पंजाबच्या खेळाडूने आनंद साजरा केला, पण हा आनंद मात्र क्षणिक ठरला, कारण यश ठाकूरचा हा चेंडू नो बॉल होता. त्यामुळे आऊट झालेला अभिषेक नाबाद राहत त्याला जीवनदान मिळालं.
शशांक सिंगने बाऊंड्री लाईनजवळ एक सोपा झेल टिपला, संघ विकेटचं सेलिब्रेशन करायला जमला, पण पंचांनी नो बॉलचा इशारा दिला आणि अभिषेक शर्माला परतावं लागलं. अभिषेक शर्माने यानंतर १९ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. अभिषेक शर्माला मिळालेलं हे जीवदान पंजाब किंग्स संघाला भारी पाडलं आणि त्याने वादळी फलंदाजी करत ट्रॅव्हिस हेडच्या मदतीने संघाच्या विजयाचा पाया रचला.