Suresh Raina Big Statement About Indian Team Captain : हार्दिक पंड्या, ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह यांसारख्या खेळाडूंना भारतीय संघाचा भावी कर्णधार म्हणून नेमण्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे, मात्र सुरेश रैनाच्या दृष्टीने हे तीन खेळाडू रोहित शर्माचे उत्तराधिकारी ठरणार नाहीत. भारतीय संघ सध्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळत असला, तरी भावी कर्णधाराबाबत अंतर्गत चर्चा सुरू झाली आहे. हार्दिक, पंत आणि बुमराह नव्हे तर शुबमन गिल भारताचा भावी कर्णधार असेल, असा विश्वास भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाने व्यक्त केला आहे.
रोहितकडून मुंबईचे कर्णधारपद काढून घेतले –
रोहित शर्माने त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले होते, परंतु या हंगामापूर्वी मुंबईने त्याच्या जागी हार्दिक पंड्याला कर्णधार म्हणून नियुक्त केले होते. मुंबईने हार्दिकचा गुजरात टायटन्सशी ट्रेड केला होता. गुजरातने हार्दिकच्या जागी शुबमन गिलला संघाचा कर्णधार बनवले होते. शुबमनच्या नेतृत्वाखाली गुजरातची टायटन्स संघ आयपीएलच्या चालू हंगामात सातपैकी चार सामने हरला आहे.
सुरेश रैनाने शुबमन गिलच्या नावाला दिली पसंती –
शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरातची कामगिरी वाखाणण्याजोगी नसली, तरी रैनाने शुबमन गिलच्या नावाला भावी टीम इंडियाचा कर्णधार म्हणून पसंती दिली आहे. एका वेबसाइटशी बोलताना सुरेश रैना म्हणाला, ‘मला वाटते, शुबमन गिल भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार बनू शकतो. तसेच तो रोहित शर्मानंतर शुबमन गिल टीम इंडियाची धुरा सांभाळताना दिसू शकतो.’ शुबमनच्या नेतृत्वाखालील गुजरातचा आयपीएल २०२४ मधील पुढचा सामना रविवारी पंजाब किंग्जशी होणार आहे.
हेही वाचा – KKR vs RCB : ३८ वर्षीय दिनेश कार्तिकने रचला इतिहास, IPL मध्ये ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला तिसरा खेळाडू
शुबमन हा आयपीएल २०२४ चा सर्वात तरुण कर्णधार –
२३ वर्षीय शुबमन गिल हा आयपीएल २०२४ चा सर्वात तरुण कर्णधार आहे. तो या हंगामात गुजरातसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. आतापर्यंत त्याने सात सामन्यांत ४३.८३ च्या सरासरीने २६३ धावा केल्या आहेत. दुसरीकडे, पंजाब किंग्जची कामगिरीही काही विशेष झाली नाही. पंजाब किंग्ज सात सामन्यांतून दोन विजयांसह गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहेत.