Actor Kamal R Khan criticizes Virat Kohli: आयपीएल २०२३ मधील ६५ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद संघात खेळला गेला. या सामन्यात आरसीबीने एसआरएचचा ८ गडी राखून पराभव केला. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना एसआरएचने हेनरिक क्लासेनच्या शतकाच्या जोरावर १८६ धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात आरसीबीने विराट कोहलीने झळकावलेल्या शतकाच्या जोरावर हे लक्ष्य गाठले. तत्पुर्वी विराट कोहलीने आपल्या शतकाचे जोरदार सेलिब्रेशन केले. या सेलिब्रेशनवरुन बॉलिवूड अभिनेता केआरके खानने त्याच्यावर टीका केली आहे.
बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल आर खान उर्फ केआरके सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. केआरके प्रत्येक विषयावर आपले मत मांडत असतो. तो केवळ एंटरटेनमेंटशी संबंधित नव्हे इतरही गोष्टीवर व्यक्त होता. यावेळी त्यांनी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीबद्दल ट्विट केले आहे. केआरकेने विराट कोहलीला त्याच्या शतकानंतर लक्ष्य केले आहे.
हैदराबादविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने शतकी खेळी साकारली. त्याने आपल्या खेळीत १२ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ६३ चेंडूंमध्ये १०० धावा केल्या. कोहलीने ४ वर्षानंतर आयपीएलमध्ये शतक झळकावले. यानंतर कोहलीने एका विशेष पद्धतीने आपल्या शतकाचा आनंद साजरा केला. विराट कोहलीने एका हातात हेल्मेट उचलून आणि दुसरीकडे बॅटवर करत प्रेक्षकांना अभिवादन केले. त्यानंतर आरसबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसकडे गेला आणि त्याला मिठी मारली. तथापि, कमाल आर खान (केआरके) याला विराट कोहलीची ही शैली आवडली नाही.
केआरकेने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “आज कोहली भाऊने १०० बनवून इतके नाटक केले आहे, जणू काय त्याने आयपीएल २०२३ जिंकले आहे. आपण नाटक केले नसते तर भाऊ साहेब विराट कोहली खूप चांगले झाले असते.” या ट्विटमध्ये त्याने विराटलाही टॅग केले आहे. केआरकेचे हे ट्विट अल्पावधीतच व्हायरल झाले. ट्विटर वापरकर्त्यांनी केआरकेकडून अशा प्रतिक्रियेबद्दल नाराजी व्यक्त केली. काही लोकांनी केआरकेच्या ट्विटर अकाऊंटवर बंदी घालण्याची मागणी केली.
सामन्याबद्धल बोलायचे, तर प्रथम फलंदाजी करत हैदराबादने क्लासेनच्या शतकामुळे २० षटकात ५ बाद १८६ धावा केल्या. ज्यामध्ये क्लासेनने ५१ चेंडूंत १०४ धावांचे योगदान दिले होते. प्रत्युत्तरादाखल, आरसीबीने १९.२ षटकांत दोन विकेट गमावत १८७ धावांचे लक्ष्य पार केले. विराट कोहलीने आरसीबीकडून शतका झळकावले. त्याचबरोबर कर्णधार फाफ डु प्लेसिसनेही ७१ धावा केल्या. या सामन्यातील विजयाबरोबर, आरसीबीने १४ गुणांसह पॉईंट टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.