Gautam Gambhir said Down but not defeated: आयपीएल २०२३ च्या एलिमिनेटरमध्ये मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपरजायंट्सचा ८१ धावांनी पराभव करून मोठा विजय नोंदवला. या विजयासह आता रोहित शर्माचा संघ दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पोहोचला आहे. आता २६ मे रोजी दुसरा क्वालिफायर सामना गुजरात टाटायटन्स आणि मुंबई यांच्यात होणार आहे. या पराभवानंतर लखनौ संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीरची प्रतिक्रिया आली आहे.
सामन्यादरम्यान गौतम गंभीर डगआउटमध्ये अस्वस्थ दिसत होता. संघाच्या पराभवामुळे गौतम चिंतेत होता. मात्र, सामना संपल्यानंतर तो सचिन तेंडुलकरशी बोलताना दिसला. आता गौतम गंभीरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून आपली व्यथा मांडली आहे. . गंभीरने ट्विट केले की, ‘पडलो आहे, पण हारलो नाही. एवढं प्रेम दाखवल्याबद्दल चाहत्यांचे मनापासून आभार. आम्ही परत येऊ.’
एलएसजीच्या साखळी फेरीदरम्यान कर्णधार केएल राहुलला दुखापत झाली होती. यानंतर राहुल उर्वरित हंगामामातून बाहेर पडला. राहुल बाहेर पडल्यानंतर क्रृणाल पांड्याने एलएसजीची जबाबदारी स्वीकारली. त्याचबरोबर क्रृणाल पांड्याने आपल्या संघाला प्लेऑफमध्ये पोहोचवण्यात महत्वाची भूमिका निभावली.
लखनऊकडून नवीन-उल-हकने सामन्यात सर्वाधिक चार विकेट घेतल्या. मात्र, त्याने चार षटकांत ३८ धावाही दिल्या. नवीनने कर्णधार रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव आणि कॅमेरून ग्रीन या महत्वाच्या खेळाडूंच्या विकेट्स घेतल्या. केवळ त्याच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२३ च्या एलिमिनेटर सामन्यात २०० च्या पुढे धावा काढता आल्या नाहीत. तसेच मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज आकाश मधवालने लखनऊविरुद्ध ५ विकेट घेत इतिहास रचला. प्लेऑफमध्ये ५ बळी घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला. याशिवाय लीगमध्ये सर्वात कमी धावा देऊन ५ बळी घेण्याच्या बाबतीत त्याने अनुभवी अनिल कुंबळेची बरोबरी केली. स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने मागे सोडले आहे.
लखनऊ आणि मुंबईच्या एलिमिनेटर सामन्याबद्दल बोलायचे, तर या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १८२ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर लखनऊला विजयासाठी १८३ धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात लखनऊचा संघ १६.३ षटकांत १०१ धावांत गारद झाला.