Gautam Gambhir angry with Naveen Ul Haq: आयपीएल २०२३ मध्ये मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात ६३ वा लीग सामना खेळला गेला. ज्यामध्ये लखनऊने ५ धावांनी विजय मिळवला. धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सचा संघ विजय अगदी सहज मिळवेल, असे वाटत होते. मात्र लखनऊच्या गोलंदाजांनी त्यांना ते जमू दिले नाही. मुंबईला शेवटच्या २ षटकात ३० धावांची गरज होती. लखनऊकडून १९ वे षटक टाकणाऱ्या नवीन-उल-हकने १९ धावा दिल्या. त्यानंतर मार्गदर्शक गौतम गंभीरची प्रतिक्रिया व्हायरल झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लखनऊचा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हकने पहिल्या तीन षटकांमध्ये चांगली गोलंदाजी केली, ज्यामुळे कर्णधार कृणाल पांड्याने १९व्या षटकासाठी त्याचे षटक राखून ठेवले होते. पण नवीन त्याच्या शेवटच्या षटकात कर्णधाराच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मुंबईचा फलंदाज टीम डेव्हिडने त्याला लांब षटकार ठोकला. मग नवीनने षटकातील चौथा चेंडू टाकला, जो एक उंच फुल टॉस असल्याने नो-बॉल होता. तो चेंडू आणि यष्टिरक्षकाच्या हातून सुटून मागे चौकार गेला.

मात्र, त्याने पुढचा म्हणजेच फ्री हिट बॉल डॉट टाकला. अशाप्रकारे नवीनने १९व्या षटकात एकूण १९ धावा खर्च केल्या. नवीनच्या या ओव्हरने डगआऊटमध्ये बसलेला गौतम गंभीर खूपच नाराज झाला. त्याने एक अनोखी प्रतिक्रिया दिली, ज्याचा फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे.

हेही वाचा – IPL 2023: ‘कोणालाही खराब कामगिरी करायची…’; सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना केएल राहुलचे प्रत्युत्तर

मुंबईला शेवटच्या षटकात ११ धावांची गरज होती आणि टीम डेव्हिड आणि कॅमेरून ग्रीन क्रीजवर उपस्थित होते. गोलंदाजीसाठी आलेल्या मोहसीन खानने केवळ ५ धावा खर्च करत लखनऊला पाच धावांनी विजय मिळवून दिला. प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन करणारा मोहिसन खान अखेरच्या सामन्यात संघाला विजय मिळवून देत सामन्याचा हिरो ठरला. मोहिसनने ३ षटकात २६ धावा देत एक विकेट घेतली. अशाप्रकारे लखनऊ प्लेऑफच्या आणखी जवळ पोहोचले.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After naveen ul haqs 19th over became expensive gautam gambhirs photo went viral vbm