Hardik Pandya’s reaction after defeat against Delhi: आयपीएल २०२३ चा ४४ वा सामना २ मे रोजी गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या कमी धावसंख्येच्या सामन्यात प्रचंड रोमांच पाहायला मिळाला. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने ८ गड्यांच्या मोबदल्यात १३० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात गुजरातचा संघ ६ विकेटच्या मोबदल्यात १२५ धावाच करू शकला. अशाप्रकारे या सामन्यात दिल्लीने गुजरातचा ५ विकेट्सने पराभव केला. या सामन्यातील पराभवानंतर गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने संघाच्या फलंदाजांवर ताशेरे ओढले.
हार्दिक गुजरातच्या फलंदाजांवर संतापला –
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या कमी धावसंख्येच्या सामन्यात हार्दिक पांड्याला पराभव पचवता आला नाही. संघाच्या फलंदाजांच्या कामगिरीवर तो संतप्त दिसत होता. सामन्यानंतर तो म्हणाला, “मी सामना जिंकण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला पण अपयशी ठरलो. हे माझ्यासाठी वेदनादायक आहे. मधल्या काही षटकात जास्त धावा होतील, अशी आशा होती पण आम्हाला लय सापडली नाही. त्यात खेळपट्टीची भूमिका होती असे मला वाटत नाही. खेळपट्टी थोडी संथ होती. आम्हाला इथे खेळायची सवय नाही. पण दिल्ली कॅपिटल्सने चांगली गोलंदाजी केली. आम्हाला वेळ काढावा लागला तिथे आम्ही सुरुवातीला विकेट गमावल्या पण तिथे थोडा वेळ घ्यायला हवा होता. विकेट्स गमावत राहिल्यास विजयाचा इरादा राखणे कठीण असते.”
हेही वाचा – “मी इथे शिव्या ऐकायला…” विराट कोहलीवर नवीन उल हकचा आरोप? संघाला म्हणाला, “मी आयपीएल…”
मी आणि इतर फलंदाजांनी शमीला निराश केले –
गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या पुढे म्हणाला, “मला वाटते की फलंदाजांनी निराश केले. चेंडूने काही विशेष केले, असे मला वाटत नाही. मोहम्मद शमीचे हे कौशल्य आहे, ज्यामुळे तो अधिक विकेट घेऊ शकला. अन्यथा या विकेटमध्ये वेगवान गोलंदाजांसाठी विशेष काही नाही. या सामन्यात शमीने ज्या प्रकारे ४ विकेट घेतल्या, त्याचे श्रेय त्याला जाते. मी म्हटल्याप्रमाणे, मी आणि इतर फलंदाजांनी शमीला निराश केले. कारण मला सामना संपवता आला नाही. पण मला विश्वास आहे की, अजून सामने खेळायचे आहेत. या सामन्यातून आम्ही शिकून आम्हाला पुढे जायचे आहे. या स्थितीत आम्ही अनेक सामने जिंकले आहेत. आम्ही अजूनही गुणतालिकेत अव्वल आहोत.”