Sanju Samson said We didn’t start well in the Powerplay: जयपूरच्या सवाई मानसिंग क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सवर मोठा विजय मिळवला. राजस्थाने प्रथम फलंदाजी करताना गुजरातला विजयासाठी केवळ ११९ धावांचे लक्ष्य दिले होते, जे त्यांनी ३७ चेंडू बाकी असताना केवळ १ गडी गमावून पूर्ण केले. गुजरातकडून ऋद्धिमान साहाने ३४ चेंडूत ४१ धावा केल्या. त्याचबरोबर कर्णधार हार्दिक पांड्याने १५ चेंडूत नाबाद ३९ धावांची स्फोटक खेळी खेळली आणि आपल्या संघाला सहज विजय मिळवून दिला. या पराभवानंतर कर्णधार संजू सॅमसनने प्रतिक्रिया दिली.
सामन्यानंतर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन म्हणाला की, “ही आमच्यासाठी कठीण रात्र होती. पॉवरप्लेमध्ये आम्ही चांगली सुरुवात करू शकलो नाही. फिरकी गोलंदाजांविरुद्ध आम्ही संघर्ष केला. त्यांचे गोलंदाज चांगली लाईन आणि लेन्थवर गोलंदाजी करत होते. तसेच मधल्या षटकांमध्ये काही महत्त्वाच्या विकेट घेत होते आणि जेव्हा असे होते तेव्हा आपण फार काही करू शकत नाही. आम्हाला आमच्या योजनेचा पुनर्विचार करावा लागेल, आम्ही चांगले क्रिकेट खेळलो का? आम्हाला अतिरिक्त प्रयत्न करावे लागतील. कारण आगामी काही सामने खूप महत्त्वाचे असतील, जे आम्हाला जिंकण्याची आशा आहे.”
तत्पूर्वी, ११९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातने चांगली सुरुवात केली. गुजरातकडून वृद्धिमान साहा आणि शुबमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी ७१ धावांची शानदार भागीदारी केली.गिल ३६ धावा करून युझवेंद्र चहलचा बळी ठरला. या विजयासह गुजरातचे १० सामन्यांतून १४ गुण झाले असून त्यांनी प्लेऑफमधील आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे.
हेही वाचा – IPL 2023 Points Table: राजस्थानच्या पराभवाने मुंबई आणि बंगळुरूचा मार्ग झाला सोपा, जाणून घ्या प्लेऑफचे समीकरण
राजस्थानचे राहिलेले सामने –
राजस्थानने आतापर्यंत १० सामन्यात १० गुण प्राप्त केले आहे. त्याचबरोबर हा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. आता राजस्थान रॉयल्सचे ४ लीग सामने बाकी आहेत. संघाचा सामना ७ मे रोजी सनरायझर्स हैदराबाद, ११ मे रोजी कोलकाता नाईट रायडर्स, १४ मे रोजी आरसीबी आणि १९ मे रोजी पंजाब किंग्जशी होणार आहे. या सामन्यांत विजय मिळवण्यासाठी राजस्थानवर दबाव असणार आहे.