LSG Assistant Coach Sreedharan Sriram on Mayank Yadav : आयपीएलच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये आपल्या वेगानं क्रिकेट विश्वात खळबळ माजवणारा एलएसजी वेगवान गोलंदाज मयंक यादव दुखापतीमुळे काही सामन्याला मुकला होता. दुखापतीमुळे जवळपास तीन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर नेटमध्ये गोलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे. लखनऊ सुपर जायंट्सचे सहाय्यक प्रशिक्षक श्रीधरन श्रीराम यांनी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या आयपीएल सामन्याच्या पूर्वसंध्येला सांगितले की, तो लवकरच पुन्हा खेळताना दिसेल, अशी आशा आहे.
दिल्लीच्या २१ वर्षीय वेगवान गोलंदाजाने लगातार ३-३ विकेट घेत आणि सलग १५० किमी प्रतितासचा वेग पार करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. मात्र तिसऱ्या सामन्यातच तो जखमी झाला. ‘साइड स्ट्रेन’मुळे तो संपूर्ण रणजी ट्रॉफी हंगाम खेळू शकला नव्हता. श्रीधरन श्रीराम शुक्रवारी म्हणाला, “तो आता नेटमध्ये गोलंदाजी करत आहे. त्यामुळे आजच्या नंतर तो कसा गोलंदाजी करतो ते बघू. तो लवकरच पुन्हा खेळताना दिसू शकेल, असे अपेक्षित आहे. गेल्या महिनाभरापासून मी त्याच्यासोबत काम केले आहे. तो खूप परिपक्व असून त्याला त्याचे शरीर चांगले माहीत आहे, जे तरुण वेगवान गोलंदाजासाठी खूप चांगली गोष्ट आहे.”
मयंक यादवची सर्वत्र चर्चा –
आयपीएल २०२४ मध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा (एलएसजी) वेगवान गोलंदाज मयंक यादवची सर्वत्र चर्चा होत आहे. या आयपीएल हंगामात आरसीबीविरुद्धच्या सामन्यात मयंक यादवने ताशी १५६.७ किमी वेगाने चेंडू टाकला होता. मयंक यादव ताशी १५६.७ किमी वेगाने चेंडू टाकून रातोरात स्टार झाला. मयंक यादवमध्ये ताशी १५० किमी वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. या वेगवान गोलंदाजाला लवकरच टीम इंडियात संधी मिळण्याची क्षमता आहे. मयंक यादवला लखनऊ सुपर जायंट्सने आयपीएल २०२२ च्या लिलावात २० लाख रुपयांच्या मूळ किमतीत विकत घेतले होते.
लखनऊसमोर राजस्थानचे आव्हान –
आयपीएल २०२४ मधील ४४वा सामना राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला जाणार आहे. राजस्थानचे लक्ष विजयाची मालिका कायम राखण्यावर असेल, तर लखनऊचे मागील पराभवाचा बदला घेण्याकडे लक्ष असेल. राजस्थान रॉयल्सने या मोसमात आठ सामन्यांत सात विजय नोंदवले आहेत आणि त्यांना पराभूत करणे लखनऊ सुपर जायंट्ससाठी कठीण काम असेल. दुसरीकडे, लखनऊ सुपर जायंट्स आठ सामन्यांत पाच विजयांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज मयंक यादव फिट व्हावा, अशी आशा लखनऊ संघाला आहे. जो दुखापतीमुळे मागील काही सामन्यांना मुकला होता.