IPL 2025 KKR vs LSG Ajinkya Rahane Statement on Eden Gardens Pitch: कोलकाता नाईट रायडर्सला मंगळवारी ८ एप्रिलला लखनौ सुपर जायंट्स संघाविरूद्ध झालेल्या सामन्यात अवघ्या ४ धावांनी पराभव पत्करावा लागला. कर्णधार अजिंक्य रहाणे आणि इतर फलंदाजांनी कडवी झुंज दिली, पण संघ अखेरीस विजय मिळवू शकला नाही. या सामन्यानंतर पत्रकार परिषदेत अजिंक्य रहाणेने ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीच्या वादाबद्दल मोठं वक्तव्य केलं.
आयपीएलमध्ये घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा याबद्दल विचारले असता, तो म्हणाला की जर मी काही बोललो तर वाद होतील. कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीबाबत निराश दिसला आणि घरच्या मैदानावर संघाच्या दुसऱ्या पराभवानंतर खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल नसल्याबद्दल त्याने निराशा व्यक्त केली.
जेव्हा ‘होम अॅडव्हान्टेज’चा वादग्रस्त मुद्दा उपस्थित करण्यात आला तेव्हा रहाणेने आपले शब्द काळजीपूर्वक निवडले आणि म्हटले की त्याच्या कोणत्याही टिप्पणीमुळे ‘वाद’ निर्माण होऊ शकतो. यजमान संघाला अपेक्षा होती की खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करेल. पण प्रत्यक्षात लखनौविरूद्ध सामन्यात तसं काहीच दिसलं नाही.
सामन्यानंतर रहाणे म्हणाला, ‘सर्वप्रथम मी हे स्पष्ट करतो की फिरकीपटूंना कोणतीही मदत मिळाली नाही.’ सुपर जायंट्सने तीन बाद २३८ धावा केल्या आणि नंतर केकेआरला २३४ धावांवर रोखले. रहाणेचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय चुकीचा ठरला, कारण प्रतिस्पर्धी फलंदाजांनी केकेआरच्या गोलंदाजांविरुद्ध सहज धावा केल्या. रहाणे म्हणाला, “त्यांनी बाऊंड्रीचा खूप चांगला वापर केला. आमच्या गोलंदाजांनीही प्रयत्न केले पण (निकोलस) पूरन आणि मिशेल मार्श यांनी खूप चांगली फलंदाजी केली.
घरच्या मैदानावर खेळण्यावर फायदा कसा होतो याबद्दल विचारले असता रहाणे म्हणाला, “पाहा, विकेटबद्दल बरीच चर्चा झाली आहे. म्हणून जर मी आता काही बोललो तर वाद निर्माण होईल. रहाणेने क्युरेटर सुजन मुखर्जी यांच्यावरही वक्तव्य करत म्हणाला, ‘आमच्या क्युरेटर्सना आधीच खूप प्रसिद्धी मिळाली आहे. मला वाटतं ते या प्रसिद्धीमुळे खूश आहेत. मी या खेळपट्टीबाबत इथे काहीच बोलणार नाही, पण मी आयपीएल आणि संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत नक्की सांगेन.”
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) विरुद्धच्या केकेआरच्या पहिल्या सामन्यात फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल खेळपट्टी तयार करण्याची केकेआरचा कर्णधार रहाणेची विनंती मुखर्जी यांनी नाकारली होती. केकेआरचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनीही म्हटले होते की घरच्या मैदानाचा फायदा मिळाल्याने कोण आनंदी होणार नाही. गेल्या आठवड्यात हैदराबादविरुद्धच्या सामन्यात रहाणेने खेळपट्टीबाबत समाधानी असल्याचे सांगितले तेव्हा हा प्रश्न सुटल्याचे दिसत असले तरी, लखनौविरुद्धच्या सामन्यानंतर रहाणेने दिलेल्या विधानामुळे खळबळ उडाली आहे.