आयपीएलच्या पंधराव्या हंगामात सर्वच लढती रोमहर्षक होत आहेत. रविवारी झालेल्या चेन्नई आणि पंजाब किंग्ज यांच्यात तर चांगलीच अटीतटीची लढत झाली. या सामन्यात पंजाबने सुरुवातीपासून चांगला खेळ केल्यामुळे चेन्नईचा दारुण पराभव झाला. दरम्यान पंजाबच्या लियाम लिव्हिंगस्टोनने धडाकेबाज फलंदाजी करत ३२ चेंडूंमध्ये ६० धावा केल्या. विशेष म्हणजे त्याने याच सामन्यात या हंगामातील सर्वात लांब षटकार लगावला. त्याच्या या खेळाचे सर्वत्र कौतूक होत आहे. लिव्हिंगस्टोनचा खेळ पाहून भारताचा माजी क्रिकेटर आकाश चोप्राने एक वेगळीच मागणी केली आहे. त्याच्या या मागणीला राजस्थानकडून खेळणारा युजवेंद्र चहलनेही अगदी मार्मिक उत्तर दिलंय.
हेही वाचा >>> IPL 2022, SRH vs LSG : आज लखनऊ- हैदराबाद आमनेसामने, जाणून घ्या दोन्ही संघांचा प्लेइंग इलेव्हन
आकाश चोप्राने काय मागणी केली ?
लियाम लिव्हिंगस्टोनचा खेळ पाहून आकाश चोप्राने एक अजब मागणी केली. जर फलंदाजाने १०० मीटरपेक्षा जास्त लांबीचा षटकार लगावला तर सहा धावांऐवजी ८ धावा दिल्या पाहिजेत, असं आकाश चोप्राने म्हटलं. त्यानंतर त्याच्या या मागणीला युजवेंद्र चहलने तेवढ्याच मार्मिक पद्धतीने उत्तर दिले. १०० मीटरपेक्षा जास्त लांब षटकार लगावल्यास आठ धावा द्यायच्या असतील तर सलग तीन चेंडू निर्धाव गेले तर फलंदाज बाद म्हणून घोषित करायला हवा, असं चहलने म्हटलंय.
हेही वाचा >>> तो फलंदाजी करताना तळपला अन् गोलंदाजीतही चमकला, लिव्हिंगस्टोनने ब्राव्होला ‘असं’ केलं बाद
विशेष म्हणजे या दोघांच्या ट्विटची सध्या चांगलीच चर्चा होत असून युजवेंद्रने आकाश चोप्राची बोलती बंद केली आहे, अशा प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. आकाश चोप्राच्या ट्विटवर चहलने दिलेल्या प्रतिक्रिया दिल्यानंतर सुरेश रैनालाही हसू आवरले नाहीये. दरम्यान या ट्विट्सची चांगलीच चर्चा होत आहे.