Akash Madhwal Takes 5 Wickets Againts LSG Video Viral : आयपीएल २०२३ चा एलिमिनेटर सामना मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियममध्ये रंगला. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मुंबईच्या फलंदाजांनी अप्रतिम खेळी करत २० षटकात ८ विकेट्स गमावत १८२ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर विजयासाठी या धावांचा पाठलाग करणाऱ्या लखनऊची मुंबईच्या गोलंदाजांनी पुरती दाणादाण उडवली.
मुंबईचा स्टार युवा गोलंदाज आकाश मधवालने चमकदार कामगिरी करत ३.३ षटकात फक्त ५ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. आकाशच्या जादुई गोलंदाजीने मुंबईला विजयाच्या दिशेनं नेलं. आकाशने लखनऊचा प्रेरक मंकड, आयुष बदोनी, निकोलस पूरन, रवी बिष्णोई आणि मोहसिन खानला बाद करून लखनऊ सुपर जायंट्सचा धुव्वा उडवला. आकाशच्या भेदक गोलंदाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. आयपीएलच्या प्ले ऑफ सामन्यात आकाशने अशी कामगिरी करून इतिहास रचला आहे.
इथे पाहा व्हिडीओ
मुंबई इंडियन्ससाठी ईशान किशनने (१५), रोहित शर्मा (११), कॅमरून ग्रीन (४१), सूर्यकुमार यादव (३३), तिलक वर्मा (२६), टीम डेविड (१३), नेहल वढेरा (२३), ख्रिस जॉर्डन (४), तर ऋतिक शौकीन शून्य धावांवर नाबाद राहिला. लखनऊसाठी नवीन उल हकने चार विकेटस् घेतल्या. यश ठाकूरने तीन विकेट्स घेतल्या, तर मोहसिन खानला एका विकेटवर समाधान मानावं लागलं.