IPL 2023, GT vs CSK Cricket Score Update : आयपीएल २०२३ चा थरार आजपासून सुरु झाला असून गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आमने-सामने आले आहेत. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात उतरलेल्या चेन्नईच्या फलंदाजांनी गुजरातच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत २० षटकांत ७ विकेट्स गमावत १७८ धावा केल्या. चेन्नईचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकडवाडने गुजरातच्या गोलंदाजांवर चौफेर फटकेबाजी केली.
मात्र, ऋतुराज ९२ धावांवर असताना गुजरातचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफने त्याला झेलबाद केलं आणि अवघ्या ८ धावांसाठी ऋतुराजचं शतक हुलकं. परंतु, जोसेफने नो बॉल फेकला होता का? याचा थर्ड अंपायरने तपास केला. त्यानंतर जोसेफने फेकलेला नो बॉल नसल्याचा निर्णय अंपायरने दिला आणि ऋतुराजला तंबूत परतावं लागलं. जोसेफने एकाच षटकात ऋतुराज गायकवाड आणि रविंद्र जडेजाला बाद केलं. जोसेफच्या भेदक गोलंदाजीचा व्हिडीओ ट्वीटवर शेअर करण्यात आला आहे.
नक्की वाचा – IPL 2023, CSK vs GT: मैदानात पाऊल ठेवताच ‘या’ खेळाडूने रचला इतिहास, देशाची वाढवली शान
इथे पाहा व्हिडीओ
गुजरातचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीने चेन्नईसाठी सलामीला मैदानात उतरलेल्या कॉन्वेची अवघ्या एका धावेवर दांडी गुल केली. पण सलामीवीर ऋतुराजने मात्र गुजरातच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत ५० चेंडूत ९२ धावा कुटल्या. मोईन अलीनेही मैदानात फलंदाजीसाठी उतरताच मोठे फटके मारले आणि १७ चेंडूत २३ धावा केल्या. गुजरासाठी मोहम्मद शामीने दोन विकेट्स घेतल्या. शामीने कॉन्वे आणि शिवम दुबेला बाद केलं. तसंच राशिद खान आणि अल्झारी जोसेफलाही दोन विकेट्स मिळाल्या. तर जोशुआ लिटिलला एका विकेटवर समाधान मानावं लागलं.