Ambati Rayudu Retirement From IPL: इंडियन प्रीमियर लीग २०२३ चा अंतिम सामना आज (२८ मे) चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जाणार आहे. मात्र याआधीच चेन्नई संघाचा स्टार खेळाडू अंबाती रायडूने मोठी घोषणा केली आहे. त्याने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. हा अंतिम सामना त्याचा शेवटचा सामना असेल. रायडूने ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंबाती रायडूने आज २८ मे रोजी केलेल्या ट्विटर पोस्टमध्ये लिहिले की, ‘मुंबई आणि सीएसके या दोन महान संघांसाठी खेळलो. २०४ सामने, १४ हंगाम, ११ प्लेऑफ, ८ फायनल, ५ ट्रॉफी. आज रात्री सहावा सामना जिंकण्याची आशा आहे.’

आता रायुडू निवृत्तीच्या निर्णयावरून ‘यू-टर्न’ घेणार नाही –

३७ वर्षीय रायडूने पुढे लिहिले की, ‘हा एक मोठा प्रवास राहिला. मी ठरवले आहे, की आज रात्रीचा अंतिम सामना हा माझा आयपीएलमधील शेवटचा सामना असेल. मला ही महान स्पर्धा खेळताना खूप आनंद झाला. तुम्हा सर्वांचे आभार. आता कोणताही यू टर्न नाही.’

अंबाती रायुडूची आयपीएल कारकीर्द –

अंबाती रायुडूने आजच्या अंतिम सामन्यापर्यंत २०३ आयपीएल सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. यादरम्यान रायुडूने २८.२९ च्या सरासरीने ४३२० धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २२ अर्धशतकं आणि एक शतकं झळकावले. तथापि, आयपीएल २०२३ चा हंगाम रायुडूसाठी काही खास ठरला नाही. तो १५ सामन्यांत १५.४४ च्या सरासरीने केवळ १३९ धावा करू शकला. आयपीएल २०२३ मध्ये, अंबाती रायडूचा वापर बहुतेक सामन्यांमध्ये इम्पॅक्ट प्लेयर म्हणून केला गेला.

गेल्या वर्षी निवृत्त होऊन निर्णय बदलला होता –

रायुडूने गतवर्षी आयपीएलच्या मध्यावर एका ट्विटमध्ये अचानक निवृत्ती जाहीर केली होती. मात्र त्यानंतर लगेचच त्यांनी त्यांचे ट्विटही डिलीट केले होते. तेव्हा रायुडू म्हणाला होता की २०२२ चा हा सीझन त्याचा शेवटचा असेल. मात्र, चेन्नई संघाचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी ही खोटी बातमी असल्याचे सांगून रायुडू निवृत्त होत नसल्याचे सांगितले. यावेळी रायुडूने निवृत्ती जाहीर केलेल्या ट्विटमध्ये तळाशी स्पष्टपणे लिहिले आहे की, यावेळी तो निवृत्तीचा निर्णय बदलणार नाही. म्हणजेच निवृत्तीतून तो यू-टर्न घेणार नाही. यावेळी त्यांचा निवृत्तीचा इरादा पक्का आहे.

हेही वाचा – IPL 2023 Final: “गुजरात टायटन्स हा मजबूत संघ आहे, पण सीएसकेने…”; फायनलपूर्वी सुनील गावसकरांची महत्त्वाची प्रतिक्रिया

२०१९ मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, त्यानंतर पुनरागमन केले –

याआधीही अंबाती रायुडूला २०१९ वनडे वर्ल्ड कपसाठी टीम इंडियामध्ये स्थान मिळाले नव्हते. विश्वचषकासाठी स्टँडबाय म्हणून त्याच्या नावाचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर रायुडूला राग आला आणि त्याने जुलै २०१९ मध्ये क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली.
मात्र, दोन महिन्यांनंतर त्याने निवृत्ती मागे घेतली आणि हैदराबाद क्रिकेट असोसिएशनला ईमेल पाठवून पुन्हा क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्त केली. यापूर्वी २०१८ मध्ये रायडूने मर्यादित षटकांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ambati rayudu announced his retirement from ipl after final csk vs gt match vbm