Virat Kohli and Gautam Gambhir Fight: आयपीएल २०२३ मध्ये लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्यात बराच वाद झाला होता. या सामन्यात विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात पहिल्यांदा वाद झाला. त्यानंतर या वादाचा शेवट विराट कोहली आणि गौतम गंभीरच्या बाचाबाचीने झाला. मात्र, या वादात कोहली आणि गंभीर यांच्यात काय संवाद झाला हे जाणून घेण्यात सगळ्यांनाच उत्सुकता आहे. एका प्रत्यक्षदर्शीने या संपूर्ण घटनेची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली आहे. वादाच्या वेळी कोहली आणि गंभीर यांच्यात काय संभाषण झाले ते त्याने सांगितले. तसेच गंभीरने काईल मेयर्सला सामन्यानंतर कोहलीशी बोलण्यास का मनाई केली होती हे देखील सांगितले.
मेयर्स आणि कोहली यांच्यात काय बोलणे झाले?
प्रत्यक्षदर्शीने सांगितले, तुम्ही टीव्हीवर पाहिले असेल की विराट जेव्हा बाकीच्या खेळाडूंशी हस्तांदोलन करून परत येत होता, तेव्हा लखनऊचा मेयर्स त्याला काहीतरी बोलतात. त्यानंतर मेयर्सने विराटला विचारले की तो आपल्या संघाला सतत शिव्या का देत आहे? विराटने उत्तर दिले की त्याने हे का सुरू केले आणि तो (मेयर्स) त्याच्याकडे सतत का पाहत होता? याआधी अमित मिश्राने विराटने नवीन-उल-हकशी गैरवर्तन केल्याची तक्रार पंचांकडे केली होती.
गंभीर आणि कोहली यांच्यात काय संवाद झाला?
प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, गंभीरला वाटले की प्रकरण आणखी बिघडू शकते, म्हणून त्याने मेयर्सला ओढले. गौतम म्हणाला त्याच्याशी पंगा घेऊ नकोस. यानंतर विराटने काही बोलताच दोघांमध्ये वाद सुरू झाला. यानंतर गौतम विराटला म्हणाला, तू काय बोलत आहेस बोल. यावर विराट म्हणाला मी तुला काही बोललो नाही, तू मध्ये का घुसत आहेस. यानंतर गौतम म्हणाला की, जर तू माझ्या खेळाडूंना शिवीगाळ केली म्हणजे याचा अर्थ तू माझ्या कुटुंबाला शिवीगाळ केली. यावर विराट म्हणाला मग तू तुझ्या कुटुंबाला सांभाळून ठेव. त्याने दोघेही एकमेकांपासून वेगळे होण्यापूर्वी गौतम म्हणाला, मग आता तू (विराट) मला शिकवणार.
हेही वाचा – IPL 2023: लखनऊ सुपर जायंट्सला मोठा धक्का! दुखापतीमुळे ‘हा’ प्रमुख गोलंदाज झाला बाहेर
या संपूर्ण वादाची सुरुवात कुठून झाली?
लखनऊच्या डावाती १७व्या षटकात विराट स्टंपच्या मागून धावत आला आणि नवीनला काहीतरी इशारा करत काही तरी म्हणाला. येथून संपूर्ण प्रकरणाला सुरुवात झाली. त्यावर अफगाणिस्तानचा नवीनही त्याच्या जवळ आला आणि दोघांमध्ये वाद सुरू झाला. या वादादरम्यान विराटनेही आपल्या बुटाकडे बोट दाखवत त्यातून माती काढत काय तर म्हणाला. बाकीच्या खेळाडूंनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा कोहली आणि अमित मिश्रा यांच्यातही वाद झाला.