Andre Russell And Rinku Singh Batting Strategy Video Viral : पंजाब किंग्जविरोधात झालेल्या सामन्यात आंद्रे रसेलने धडाकेबाज फलंदाजी केली. रसेलनं २३ चेंडूत ४२ धावांची खेळी साकारली. या इनिंगमधअये रसेलने ३ चौकार आणि ३ षटकार ठोकले आणि कोलकाताला दणदणीत विजय मिळवून दिला. रसलच्या शानदार इनिंगसाठी त्याला प्लेयर ऑफ द मॅचचा किताब देण्यात आला. परंतु, शेवटच्या षटकात रसेल धावबाद झाला आणि सामना अटीतटीचा झाला. कारण शेवटच्या चेंडूवर रिंकू सिंगकडे स्ट्राईक गेली. रसेल एक स्फोटक फलंदाज आहे. अशातच त्याने शेवटच्या चेंडूवर स्ट्राईक त्याच्याकडे ठेवली नाही आणि वेगानं धाव काढण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. त्याने काढलेली धाव संघासाठी एक टर्निंग पॉईंट ठरला असता, यावर रसेलने माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
रसेल म्हणाला की, मला रिंकूवर विश्वास होता. तो आमचा फिनिशर आहे. पाचव्या चेंडूआधी आम्ही आपआपसात चर्चा केली होती. त्याने सांगितलं की, जर चेंडू मिस झाला तर आपण धावा घेण्यासाठी प्रयत्न करायचा. तो चेंडू मी मिस केला आणि धावा काढण्याच्या प्रयत्नात दुर्देवाने बाद झालो. रिंकूही मॅच फिनिश करतो. त्यामुळे मला धाव काढण्यात कोणताही टेन्शन नव्हता. मला रिंकूवर गर्व आहे.”
इथे पाहा व्हिडीओ
कोलकाताचा कर्णधार नितीश राणाने रिंकूबाबत प्रतिक्रिया देत म्हटलं, याआधी आमच्या संघात रसेल-रसेलचा बोलबाला होता. आता आमच्याकडे रसेलशिवाय दोन फिनिशर आहेत. चाहते रिंकू-रिंकू असं चिअर अप करतात, हे पाहून मला आनंद झाला. आता तो आमचा महत्वाचा खेळाडू बनला आहे. त्याने त्याच्या करिअरमध्ये असं काही करून दाखवलं आहे, जे क्रिकेटर्सला पूर्ण करिअरमध्ये करता येणं शक्य होत नाही. रिंकूने कमाला केली आहे. मला विश्वास होता, तो आम्हाला सामना जिंकवून देईल.”