आयपीएलमध्ये रॉयल चँलेजर्स बंगळुरू आणि हैदराबाद सनरायजर्स यांच्यात शुक्रवारी झालेल्या सामन्यादरम्यान पुन्हा एकदा विराट कोहलीच्या तापट स्वभावाचा प्रत्यय आला. एरवीसुद्धा विराट मैदानात प्रतिस्पर्ध्यांच्या ‘अरे’ ला ‘का रे’ करण्याचा विराटचा स्वभाव आहे. मात्र, शुक्रवारी विराट कोहली थेट सामन्याचे पंच कुमार धर्मसेना यांनाच जाऊन भिडला. विराट माघार घेतो ना तोच यष्टीरक्षक दिनेश कार्तिकही या वादात सहभागी झाला. या दोघांनीही पंचांशी आक्रमक भाषेत संवाद साधला. त्यामुळे थोड्यावेळासाठी सर्व प्रेक्षक भांबावून गेले होते.
सामन्यादरम्यान विराट आणि पंच यांच्यात झालेल्या बाचाबाचीचे कारण होतं, पाऊस… पाऊस पडत असून देखील सामना सुरू ठेवल्याबद्दल विराटने पंचांच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली. पावसामुळे सामना २ तास ४० मिनिटे उशिराने सुरू झाला होता. त्यामुळे सामना ११-११ षटकांचा ठेवण्यात आला होता. सनरायजर्सचा डाव संपण्यासाठी शेवटची दोन षटके असताना तर खूपच जोरात पाऊस पडत होता. त्यामुळे क्षेत्ररक्षण करण्यात अडचण येत होती. मात्र, पंचानी त्याकडे दुर्लक्ष करत खेळ सुरू ठेवल्याने विराट कुमार धर्मसेना यांच्यावर चांगलाच भडकला होता. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर संतप्त भाव स्पष्टपणे पहायला मिळत होते. मात्र, या सामन्यात विराट कोहलीने १९ चेंडूमध्ये नाबाद ४४ धावांची आक्रमक खेळी करत बंगळुरूला विजय मिळवून दिला.
यंदाच्या आयपीएल मोसमात मिचेल स्टार्कविरुद्ध पहिला षटकार
विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियासाठी गोलंदाजीत चमकदार कामगिरी करणाऱ्या मिचेल स्टार्क आयपीएलमध्येही टिच्चून गोलंदाजी करत आहे. त्याच्या अचूक आणि भेदक गोलंदाजीमुळे प्रतिस्पर्धी फलंदाजांना त्याच्याविरुद्ध धावा जमवणे अवघड होत आहे. त्यामुळेच की काय यंदाच्या आयपीएल मोसमात आत्तापर्यंत त्याच्याविरुद्ध प्रतिस्पर्ध्यांना एकही षटकार लगावता आला नव्हता. मात्र, कालच्या सामन्यातील शेवटच्या षटकात इयान मॉर्गनने स्टार्कला षटकार खेचत हा विक्रम खंडीत केला.