Anrich Nortje returns home: आयपीएल २०२३ मधील ५० वा सामना आज (शनिवारी) अरुण जेटली स्टेडियमवर संध्याकाळी साडेसातला खेळला जाणार आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स समोर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचे आव्हान असणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाला एक मोठा धक्का बसला आहे. संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्किया या सामन्यात खेळताना दिसणार नाही. वैयक्तिक कारणास्तव तो दक्षिण आफ्रिकेला परतला आहे.
दिल्ली कॅपिटल्सने अधिकृत सोशल मीडिया हँडलवर ही माहिती दिली. दिल्ली कॅपिटल्सने आपल्या ट्विटमध्ये लिहले, “एनरिक नॉर्किया आपल्या वैयक्तिक कारणामुळे शुक्रवारी रात्री उशिरा दक्षिण आफ्रिकेला रवाना व्हावे लागले. आज संध्याकाळच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यासाठी तो अनुपलब्ध असेल”. एनरिक नॉर्कियाच्या अचानक परतण्यामागे एक मोठे कारण असावे, म्हणून तो काल रात्रीच आपल्या देशात परतला. अधिकृत नोटिफिकेशनमध्ये कारण उघड करण्यात आले नसले तरी चाहत्यांनी कमेंट करताना त्याच्यासाठी प्रार्थना करत आहे.
या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी चांगली झाली नाही. पहिल्या ९ सामन्यात संघाला फक्त ३ जिंकता आले आहेत, तर ६ मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. बंगळुरूविरुद्धचा हा सामना जिंकणे दिल्ली संघाला आवश्यक आहे. जर दिल्लीने जिंकला तर तो स्पर्धेत कायम राहील, अन्यथा समस्या उद्भवू शकतात.
एनरिक नॉर्कियाच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने ८ सामन्यात ७ विकेट घेतल्या आहेत. या मोसमात बंगळुरूविरुद्धच्या पहिल्या सामन्यात दिल्लीचा पराभव झाला, त्यात नोर्कियाची कामगिरी चांगली झाली नाही. त्याने आरसीबीविरुद्ध ४ षटकात ३१ धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही.
हेही वाचा – IPL 2023 RCB vs LSG: विराट कोहलीला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी! दिल्लीविरुद्ध फक्त ‘इतक्या’ धावांची गरज
दिल्ली आणि बंगळुरुची आकडेवारी –
याआधी दोन्ही संघ २९ वेळा आमनेसामने आले आहेत. यातील १८ सामने बंगळुरूने तर १० सामने दिल्लीने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला. अरुण जेटली स्टेडियमवर दोन्ही संघ नऊ वेळा आमनेसामने आले आहेत. यातील सहा सामने बेंगळुरूने तर तीन सामने दिल्लीने जिंकले आहेत.