Arjun fulfilled an unfulfilled dream of Sachin Tendulkar: आयपीएल २०२३ मधील २५ वा सामना मंगळवारी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात खेळला गेला. या रोमांचक सामन्यात मुंबईने अर्जुन तेंडुलकरच्या शेवटच्या षटकातील शानदार गोलंदाजीच्या जोरावर १४ धावांनी विजय मिळवला. त्याचबरोबर या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने एक खास पराक्रम केला आहे, जो सचिन तेंडुलकर करु शकलेला नाही. काय आहे तो पराक्रम जाणून घ्या.
क्रिकेटच्या महान खेळाडूंपैकी एक असलेल्या सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीत अनेक मोठे विक्रम रचले आहेत. त्याच्या नावावर असे अनेक विक्रम आहेत, जे मोडणे कठीण आहे. पण मंगळवारी रात्री त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आयपीएलमधला दुसरा सामना खेळायला आला आणि सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या या मॅचमध्ये त्याने आयपीएलची पहिली विकेट घेतला. तसेच त्याने सचिनलाही न जमलेला एक कारनामा करुन दाखवला.
सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने १९३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र हैदराबाद संघाने शानदार फलंदाजी करताना एका क्षणी लक्ष्याच्या जवळ पोहोचून ह्रदयाचे ठोके वाढवले. हैदराबादला सामन्याच्या शेवटच्या षटकात २० धावांची गरज होती आणि त्यांच्या दोन विकेट शिल्लक होत्या. त्यानंतर रोहित शर्माने सर्वांना चकित करत अर्जुन तेंडुलकरकडे चेंडू सोपवला.
यानंतर षटकाच्या पाचव्या चेंडूवर तो क्षण आला ज्याची सर्वजण वाट पाहत होते. अर्जुनने भुवनेश्वरला एक उत्कृष्ट यॉर्कर लेन्थ बॉल टाकला, भुवनेश्वर कुमारचा शॉट चुकला आणि चेंडू बॅटच्या बाहेरील कडा घेऊन थेट एक्स्ट्रा कव्हरवर उभ्या असलेल्या कर्णधार रोहित शर्माच्या हातात गेला आणि अर्जुन तेंडुलकरचे आयपीएलमधील विकेटचे खाते उघडले.
सचिन तेंडुलकरने आपल्या आयपीएल कारकिर्दीत काही षटके टाकली आहेत. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक वेळा विरोधी फलंदाजांना बाद करणाऱ्या सचिनला आयपीएलमध्ये एकही विकेट घेता आली नाही. पण त्यांच्या मुलाने त्यांचे ते स्वप्न नक्कीच पूर्ण केले आहे.