IPL 2025 MI vs KKR Ashwani Kumar on His Dream IPL Debut: मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील अश्वनी कुमार हे नाव आता सर्वांच्या परिचयाचं झालं आहे. अश्वनी कुमारने आयपीएल २०२५ मधील केकेआरविरूद्धच्या सामन्यात पदार्पण केले आणि पदार्पणात त्याने ४ विकेट्स घेत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडेच्या मैदानावर हा सामना खेळवला जात आहे. या ऐतिहासिक कामगिरीनंतर अश्वनी कुमार मुलाखतीत म्हणाला की तो दुपारी जेवलेला नाही.

अश्वनी कुमारचा हा पहिलाच आयपीएल सामना होता. मुंबई इंडियन्सने आयपीएल लिलावात त्याला ३० लाख रूपयांच्या किमतीसह संघात सामील केलं होतं. २०२३ च्या शेर-ए-पंजाब ट्रॉफीमध्ये तो सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता, या कामगिरीसह त्याने संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली होती.

२३ वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज अश्वनी कुमार पंजाबकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो आणि तो मोहालीच्या झांजेरी गावचा आहे. गेल्या मोसमात त्याचा पंजाब किंग्ज संघात समावेश करण्यात आला होता, मात्र त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही.

पदार्पणाच्या सामन्यात चार विकेट घेतल्यानंतर अश्विनी कुमार म्हणाला, “या कामगिरीनंतर खूप छान वाटतंय, पदार्पणाच्या सामन्यात दडपण होतं पण सांघिक वातावरणामुळे शांत राहण्यास मदत झाली. मी आज दुपारी जेवलो नाही आणि फक्त केळं खाल्लं. सामन्याचं इतकं टेन्शन होतं की मला भूकही लागत नव्हती. संघ व्यवस्थापनाने सांगितले की हा पदार्पण सामना आहे, मैदानावर जाऊन गोलंदाजीचा आनंद घे आणि आपल्या कौशल्यावर फोकस करत गोलंदाजी कर.”

पुढे अश्वनी म्हणाला, “कर्णधाराने (हार्दिक पांड्या) चांगली साथ दिली आणि चेंडू विकेटवर टाकत राहण्याचा सल्ला दिला. माझ्या गावातील सगळे मला सामन्यात खेळताना पाहत असतील. मला आज खेळण्याची संधी मिळाली आणि मी खूप आनंदी आहे.”

मुंबई संघात दाखल झालेल्या अश्वनी कुमारने आयपीएल कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर अजिंक्य रहाणेला झेलबाद केले. यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही आणि विकेट्सची रांग लावली. अश्वनी कुमारने तीन षटकांत २४ धावा देत चार विकेट घेतले. परिणामी केकेआर संघ ११६ धावांवर सर्वबाद झाला.