अहमदाबाद : फिरकीपटू रविचंद्रन अश्विन हा दिग्गज खेळाडू असून त्याने वर्षांनुवर्षे दर्जेदार कामगिरी केली आहे. मात्र, त्याने अजूनही गोलंदाजीत सुधारणेबाबत आणि अधिकाधिक ऑफ-स्पिन चेंडू टाकण्याबाबत विचार केला पाहिजे, असे मत ‘आयपीएल’ संघ राजस्थान रॉयल्सचा क्रिकेट संचालक कुमार संगकाराने व्यक्त केले.

कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक बळी (४४२) मिळवणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर असलेला अश्विन गोलंदाजीत विविध प्रयोग करण्यासाठी ओळखला जातो. ‘‘अश्विन दिग्गज खेळाडू असला, तरी त्याच्या गोलंदाजीत सुधारणेला नक्कीच वाव आहे. विशेषत: ऑफ-स्पिन चेंडू अधिकाधिक कसे टाकता येतील याबाबत त्याने विचार करावा,’’ असे संगकारा म्हणाला. 

‘बीसीसीआय’कडून मैदान कर्मचाऱ्यांना रोख बक्षीस

मुंबई : ‘आयपीएल’चा यंदाचा हंगाम यशस्वीरीत्या पार पडण्यात खेळपट्टी देखरेखकार (क्युरेटर) आणि मैदान कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे त्यांना १.२५ कोटी रूपयांचे रोख बक्षीस देणार असल्याची घोषणा ‘बीसीसीआय’ने सोमवारी केली. ‘‘सहा मैदानांवर मेहनत घेणारे खेळपट्टी देखरेखकार आणि मैदान कर्मचारी हेसुद्धा नायक आहेत. त्यामुळे ब्रेबॉर्न, वानखेडे, डॉ. डी. वाय. पाटील आणि ‘एमसीए’ पुणे स्टेडियमला प्रत्येकी २५ लाख, तर ईडन गार्डन्स आणि नरेंद्र मोदी स्टेडियमला १२.५ लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले आहे,’’ असे ‘बीसीसीआय’चे सचिव जय शाह म्हणाले.