आयपीएल स्पर्धा ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंकरिता अनुभवासाठी खूपच उपयुक्त ठरणार आहे. त्याचा फायदा आम्हाला आगामी स्पर्धा व मालिकांकरिता होईल. त्यामुळे आमचा संघ आंतरराष्ट्रीय क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थान गाठेल, असा आत्मविश्वास ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार शेन वॉटसन याने व्यक्त केला. वॉटसन हा आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंची सध्याची कामगिरी, आयपीएलमधील ऑसी खेळाडू आणि भविष्यातील कामगिरीविषयी त्याने केलेली बातचीत-
भारतात कसोटी मालिकेच्या दौऱ्यापेक्षा आता तू अतिशय प्रसन्न दिसत आहे. त्याचे रहस्य काय?
भारतात कसोटी सामने सुरू असताना माझ्यावर खूपच दडपण होते, कारण मी एक पिता होणार होतो. मूल झाल्यानंतर माझ्यावरील मोठे दडपण दूर झाले. माझी पत्नी आणि मुलाची प्रकृती आता उत्तम आहे. त्यामुळे मी निश्चिंत मनाने येथे खेळायला आलो आहे. कसोटी मालिकेसाठी मी ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करीत होतो, आता मी एका आयपीएल संघाचे प्रतिनिधित्व करीत आहे. संघनिष्ठा मी जपणारच, पण आता खूप आरामात मी खेळत आहे.
एक अष्टपैलू खेळाडू म्हणून तुझा नावलौकिक आहे, मात्र गेले काही महिने तू केवळ फलंदाजीवरच लक्ष देत आहेस. याबाबत काय सांगशील?
कसोटी मालिका आणि त्यानंतर आयपीएल स्पध्रेत मी फारशी गोलंदाजी केलेली नाही. माझा खांदा थोडासा दुखत असल्यामुळे मी स्वत:हूनच गोलंदाजीची जबाबदारी घेतलेली नाही. खरेतर येथील खेळपट्टय़ांवर गोलंदाजी करणे मला आवडले असते. मात्र भावी कारकीर्दीचा विचार करताना शारीरिक तंदुरुस्तीकडेही लक्ष देणे जरुरीचे आहे.
ज्या खेळपट्टीवर तुमच्या संघाचे कसोटीत पानीपत झाले, त्याच मैदानावर तुमचे ऑस्ट्रेलियन खेळाडू चांगली कामगिरी करीत आहेत. नेमके कसोटीत काय घडले?
आम्ही फिरकी गोलंदाजीना सामोरे जात भारतीय मैदानांवर वर्चस्व गाजविले आहे, पण तरीही नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत आमची कामगिरी खूपच खराब झाली. त्याला अनेक कारणे आहेत, एक मात्र नक्की की आम्ही भारताविरुद्ध झालेल्या मालिकेतील चुकांचे निरसन करीत आहोत. संघातील सर्वच खेळाडू पराभवाला कारणीभूत आहेत. कदाचित आमच्या संघाचे ते ‘सांघिक’ अपयश असेल. या मालिकेतील कामगिरीपासून आम्ही बराच बोध घेतला आणि अजूनही बोध घेत आहोत. आरोन फिन्च, मिचेल जॉन्सन, ग्लेन मॅक्सवेल आदी युवा खेळाडूंना आयपीएल स्पर्धेद्वारे ऑसी संघाची दारे खुली होणार आहेत. आमच्या संघातील अनेक अनुभवी आणि युवा खेळाडूंना भारतात आयपीएलद्वारे पुन्हा सूर गवसण्यासाठी चांगली संधी मिळत आहे.
संघाचा कर्णधार मायकेल क्लार्क याच्याशी तुझे मतभेद आहेत काय?
आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. संघातील खेळाडूंवरून थोडेसे तात्विक मतभेद असू शकतात, पण याचा अर्थ आम्ही एकमेकांना पाण्यात बघतो असे म्हणणे चुकीचे होईल. आम्ही एकमेकांचे खूपच चाहते आहोत. क्लार्क हा अतिशय चांगला व कल्पक कर्णधार आहे. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याला अपयश आले असले तरी त्याच्यामधील नेतृत्वशैली कमकुवत आहे असे म्हणणे चुकीचे होईल.
आगामी मालिकांकरिता ऑस्ट्रेलियन संघाची कशी तयारी केली जात आह़े?
आयपीएलमध्ये आमच्या संघातील बरेचसे खेळाडू सहभागी झाले आहेत. त्यामुळे आपोआप या खेळाडूंना सराव करण्याची संधी मिळाली आहे. अ‍ॅशेस मालिका आमच्याकरिता अतिशय प्रतिष्ठेची आहे. त्यादृष्टीने संभाव्य खेळाडूंची निवड करीत त्यांच्याकरिता विशेष सराव शिबीर घेण्याचा क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा मानस आहे. भारताविरुद्धच्या मालिकेतील लाजिरवाण्या पराभवाचे शल्य आम्हा सर्वानाच बोचत आहे. अशा चुका पुन्हा होणार नाहीत याची काळजी घेतली जाणार आहे. अव्वल दर्जाचा संघ म्हणून ऑस्ट्रेलियाचा संघ पुन्हा नावलौकिक मिळवेल, अशी मला खात्री आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा