IPL 2025 Avesh Khan Statement on Last Over Heroics vs RR: राजस्थान रॉयल्सचा संघ पुन्हा एकदा अखेरच्या षटकात ९ धावा करण्यात अपयशी ठरला. राजस्थानला दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध सामन्यात मिचेल स्टार्कने पराभवाचा धक्का दिला. तर लखनौ सुपर जायंट्सविरूद्ध सामन्यात आवेश खानने राजस्थानकडू विजय हिसकावून घेतला आहे. आवेश खानच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर संघाने दणदणीत विजय मिळवला आहे. पण विजयानंतरही आवेश खानने मोठं वक्तव्य केलं आहे.
लखनौने एडन मारक्रमच्या ६६ धावा, आयुष बदोनीचे शतक आणि अब्दुल समदच्या ३० धावांच्या जोरावर १८० धावांचा पल्ला गाठला. पण राजस्थानचा संघ ५ विकेट्स गमावत १७८ धावा करू शकला. राजस्थानचा संघ फलंदाजी करताना सुरूवातीपासूनच सामन्यात पुढे होता. यशस्वी जैस्वाल आणि वैभव सूर्यवंशीने संघाला चांगली सुरूवात करून दिली. पण राजस्थानचा संघ अखेरच्या दोन षटकांत धावा करण्यात अपयशी ठरला.
आवेश खान या सामन्याचा सामनावीर ठरला, ज्याने ४ षटकांच्या स्पेलमध्ये ३ विकेट्स घेतले. आवेश खानला २०व्या षटकापूर्वी १८वे षटक टाकण्यासाठी बोलवण्यात आले. या १८व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर त्याने यशस्वी जैस्वालला झेलबाद केले. तर अखेरच्या चेंडूवर रियान परागला झेलबाद केलं. या दोन विकेट्समुळे सामना फिरला, कारण हे दोन्ही संघाचे सेट फलंदाज होते. यानंतर अखेरच्या षटकात त्याने शिमरॉन हेटमायरला झेलबाद केलं आणि कमालीचे यॉर्कर टाकत राजस्थानला पराभूत करण्यात मोठी भूमिका बजावली.
सामनावीर ठरल्यानंतर आवेश खान काय म्हणाला?
आवेश खानला अखेरच्या षटकातील शेवटचा चेंडू मनगटाला चेंडू लागला आणि कासावीस झाला होता. विजयाचं सेलिब्रेशन करण्यापेक्षा तो वेदनेने कळवळताना दिसला. सामनावीर ठरल्यानंतर आवेश खानला याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तो म्हणाला, “चेंडू हातावर आपटला आणि डोळ्यासमोर तारे चमकले. माझा हात आता बरा आहे. मला वाटलं की माझं हाड मोडलं कारण चेंडू थेट येऊन आदळला. ज्यामुळे सेलिब्रेट करू शकलो.”
यानंतर स्टार्कने दिल्लीकडून राजस्थानविरूद्ध अखेरच्या षटकात उत्कृष्ट यॉर्कर टाकत अशीच गोलंदाजी केली होती. याबद्दल बोलताना मुरली कार्तिक म्हणाला, सायमन डुल कॉमेंट्री करताना म्हणाले की आता आवेश खान त्याच्यामधील मिचेल स्टार्क या संघाविरूद्ध जागा होईल, याबाबत तुझं काय म्हणणं आहे. यावर बोलताना आवेश म्हणाला, “मला मिचेल स्टार्क व्हायचं नाही, मला चांगला आवेश खानचं व्हायचं आहे. यॉर्कर माझी ताकद आहे आणि मी माझा चांगला यॉर्कर टाकण्याचीच रणनिती असते. मी स्कोअरकार्ड बघून गोलंदाजी करत नाही. मला पहिल्या तीन चेंडूंवर बाऊंड्री द्यायची नव्हती आणि फलंदाजावर दबाव टाकायचा होता.”
डेव्हिड मिलरने आवेशच्या अखेरच्या षटकात एक कॅच ड्रॉप केली, याबाबत तो म्हणाला, “जेव्हा चेंडू हवेत उंच उडाला, मला खात्री होती की तो हा झेल नक्की पकडेल. त्याने झेल सोडल्यानंतर त्यांना विजयासाठी एका चेंडूत ४ धावांची गरज होती. त्यावेळेस माझ्या मनात बरेच विचार येत होते. एक आऊटसाईड किंवा इनसाईड एज लागली तरी चौकार जाऊ शकतो. मी मिडल लेगला एक यॉर्कर टाकायचं मनाशी पक्क केलं. मला फक्त संघासाठी सामने जिंकायचे आहेत. ही खूप मोठी स्पर्धा आहे मी उर्वरित सर्व सामन्यांमध्ये अशीच गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करेन.”