LSG vs DC Cricket Match Update : लखनऊ सुपर जायंट्सचा नवीन खेळाडू केली मायर्सने आयपीएलच्या पदार्पणातच धडाकेबाज फलंदाज म्हणून छाप टाकली आहे. दिल्ली कॅपिटल्सविरोधात झालेल्या सामन्यात मेयर्सने गोलंदाजांचा धुव्वा उडवत ३८ चेंडूत ७३ धावांची वादळी खेळी केली. मेयर्सने ७३ धावांच्या खेळीत २ चौकार आणि ७ षटकार ठोकले. मेयर्सच्या अर्धशतकाच्या जोरावर लखनऊने २० षटकांत ६ विकेट्स गमावत १९३ धावांपर्यंत मजल मारली होती. मेयर्सची चौफेर फटकेबाजी पाहून दिल्लीच्या गोलंदाजांना घाम फुटला होता. पण अक्षर पटेलच्या एका फिरकीनं मेयर्सचा झंझावात थांबला. अक्षरने फिरकी चेंडू फेकून मेयर्सचा त्रिफळा उडवला. चेंडू खेळपट्टीवरून घुमजाव करत थेट स्टंपला लागल्याने मेयर्सही अवाक झाला. अक्षरच्या या भेदक गोलंदाजीचा व्हिडीओ आयपीएलच्या ट्वीटर हॅंडलवर शेअर करण्यात आला आहे.
मेयर्स खेळपट्टीवर असताना चौकार-षटकारांचा पाऊस पाडत होता. त्याची धडाकेबाज फलंदाजी पाहून सर्वांनाच वाटलं असेल की, मेयर्स शतकी खेळी करेल. पण अक्षरच्या एका फिरकी चेंडून मेयर्सला चकवा दिला अन् तो क्लीन बोल्ड झाला. अक्षरने चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरच्या दिशेनं फेकला होता, त्यावेळी फलंदाजाने चेंडूच्या लाईनवर जाऊन ऑफ साईडला कट शॉट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू खेळपट्टीवरून जास्त उसळून फिरला आणि थेट स्टंपला जाऊन धडकला. चेंडूने अशाप्रकारे चकवा दिल्याचं पाहून मेयर्सला आश्चर्य वाटलं.
अक्षरने मेयर्सची वादळी खेळी थांबवल्यानंतर मैदानात दिल्लीच्या खेळाडूंनी जल्लोष केला. अक्षरने फेकलेल्या चेंडूचा व्हिडीओ आयपीएलच्या अधिकृत ट्वीटर हॅंडलवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला ‘Unplayable’! असं कॅप्शन देण्यात आलं आहे. लखनऊने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ६ विकेट्स गमावत १९३ धावा केल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूडने १४ धावा देत ५ विकेट्स घेतल्या आणि लखनऊने दिल्ली कॅपिटल्सवर ५० धावांनी विजय मिळवला.